Mehkar Municipality : नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तेरा प्रभागांमधील आरक्षण सोडत ८ ऑक्टाेबर राेजी नगरपरिषद सभागृहात काढण्यात आली. महिलांसाठी सात जागा राखीव आणि सर्वसाधारण १४ तर ओबीसीसाठी तीन खुल्या जागा असणार असून अनुसूचित जाती सर्वसाधारण दोन जागा असे आरक्षण काढण्यात आले. इच्छुकांच्या दृष्टीने कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती झाली आहे.

सर्व साधारण १४ तर ओबीसींसाठी तीन जागा राहणार : कही खुशी कहीं गमची स्थिती
मेहकर : नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तेरा प्रभागांमधील आरक्षण सोडत ८ ऑक्टाेबर राेजी नगरपरिषद सभागृहात काढण्यात आली. महिलांसाठी सात जागा राखीव आणि सर्वसाधारण १४ तर ओबीसीसाठी तीन खुल्या जागा असणार असून अनुसूचित जाती सर्वसाधारण दोन जागा असे आरक्षण काढण्यात आले. इच्छुकांच्या दृष्टीने कहीं खुशी कहीं गम अशी स्थिती झाली आहे.
नगरपरिषदेत आता २६ नगरसेवक असणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार ८ ऑक्टाेबर नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी ,मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक प्रभागासाठी लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. तेराही प्रभागांमध्ये १३ सर्वसाधारण गटातील उमेदवार असणार आहेत. प्रभाग क्रमांक ३,९,१३ मध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग क्रमांक १ व १० अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात प्रभाग क्रमांक २,४,६,७ महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये प्रभाग क्रमांक ८ व ११ खुला आहे. प्रभाग क्रमांक ५ , १२ खुल्या गटासाठी आहे. अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील खुल्या गटात त्या त्या प्रवर्गाचे पुरुष अथवा महिला उमेदवारी दाखल करू शकतात. आधीपासून निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागलेल्या काही जणांचा यात अपेक्षाभंग झाला आहे. तर काही जणांना अनपेक्षित रित्या यात संधी मिळणार असल्याचे आरक्षण सोडतीतून दिसून आले. राजकीय पक्षांमध्ये आता आरक्षण सोडती नुसार उमेदवारांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. नगराध्यक्ष पद खुले असल्याने त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे त्यामुळे येणारी निवडणूक रंगतदार ठरणार हे निश्चित आहे.

