Savitribai Phule’s birth anniversary : स्त्री शिक्षणासाठी अपार संघर्ष करत महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पातूर येथील समाजसेवक व शिर्ला ग्रामपंचायत सदस्य मंगल डोंगरे यांच्या वतीने लक्ष्मीबाई देशपांडे विद्यालय, पातूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

समाजसेवक मंगल डोंगरे यांचा स्तुत्य उपक्रम; सावित्रीबाई फुलेंना आदरांजली
राहुल सोनोने
दिग्रस बू. : स्त्री शिक्षणासाठी अपार संघर्ष करत महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पातूर येथील समाजसेवक व शिर्ला ग्रामपंचायत सदस्य मंगल डोंगरे यांच्या वतीने लक्ष्मीबाई देशपांडे विद्यालय, पातूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. वंदना सरप मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक व ग्रामपंचायत सदस्य मंगल डोंगरे, प्रा. शंकर गाडगे, निखिल उपर्वट, मनोज इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. यानंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी प्रेरणादायी भाषणे सादर केली. स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मंगल डोंगरे यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत मंगल डोंगरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानप सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डाखोरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

