Mahabreaking

[breaking_news]

Sand Mafia :वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला; तातडीच्या कारवाईची मागणी

Sand Mafia : सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर कथित रेती माफियांकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा साखरखेर्डा येथे विविध पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

Sand Mafia

जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने निवेदन, घटनेचा तीव्र निषेध

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड परिसरात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीबाबत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर कथित रेती माफियांकडून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा साखरखेर्डा येथे विविध पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. तसेच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

यावेळी तालुका व जिल्हास्तरीय विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप नाईकवाड, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रतापराव मोरे, जिल्हाध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा सचिव सचिन खंडारे, प्रसिद्धी प्रमुख प्रल्हाद देशमुख, तालुकाध्यक्ष समाधान सरकटे, समाधान म्हस्के (हिवरा आश्रम), पवन मगर (मलकापूर-पांग्रा), जुबेर शहा, विजय देशमुख (जांभोरा), डॉ. गंगाराम उबाळे, अशोक खरात, एस. पी. शिंगणे, भगवान साळवे, अमीन शहा आदी पत्रकार उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड–राहेरी रेती घाटावर सुरू असलेल्या कथित अवैध रेती वाहतुकीविरोधात ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार रामदास कहाळे घटनास्थळी गेले असता, अवैध रेती वाहतुकीशी संबंधित व्यक्तींनी काही गुंडांच्या मदतीने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघटनांनी ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. पत्रकार हे समाजातील सत्य, भ्रष्टाचार आणि जनसामान्यांचे प्रश्न लोकांसमोर आणण्याचे काम करीत असतात. मात्र, अलिकडच्या काळात समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून पत्रकारांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली.

पत्रकार संघटनांच्या वतीने आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार तसेच इतर अजामीनपात्र कलमांन्वये कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच पत्रकारांना कर्तव्य बजावताना पोलिस प्रशासनाने आवश्यक संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस प्रशासनाने २४ तासांच्या आत ठोस कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top