Zelensky :रशिया-युक्रेन युद्ध : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, ते रशियाशी समझोता करण्यास तयार आहेत; मात्र तो समझोता युक्रेनच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या किंमतीवर असणार नाही.

कीव : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले की, ते रशियाशी समझोता करण्यास तयार आहेत; मात्र तो समझोता युक्रेनच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या किंमतीवर असणार नाही.
‘क्योडो न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, “आम्ही अमेरिकेसोबत चर्चेस तयार आहोत, पण रशियाकडून वारंवार येणारे अल्टिमेटम स्वीकारण्यासाठी तयार नाही. रशिया हा आक्रमक देश आहे, हे सर्वांनी मान्य केले आहे. अनेक देशांनी या युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचाही तोच निष्कर्ष आहे.”
झेलेन्स्की यांनी सांगितले की, आक्रमक देशाशी चर्चा करण्यास तयार होणे हेच एक मोठे ‘कॉम्प्रोमाइज’ आहे. “रशियाने आमच्या सुमारे २० टक्के भूभागावर कब्जा केला आहे. तरीही आम्ही ‘जिथे आहोत तिथेच राहू’ या तत्त्वावर शांततेची चर्चा करण्यास तयार आहोत. हा मोठा समझोता आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “कॉम्प्रोमाइज केल्यानंतर रशिया आम्हाला काय हमी देतो? ते म्हणतात, उरलेल्या भागावर कब्जा करणार नाही. ही भाषा दहशतवादासारखी आहे. हे समझोता नसून अल्टिमेटम आहे.”
“आम्ही असा समझोता करू इच्छितो, जो युक्रेनची सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, आमची सेना, आमचे नागरिक आणि आमच्या मुलांचा सन्मान राखेल. मात्र आम्ही कोणत्याही अल्टिमेटमसाठी तयार नाही,” असा ठाम इशारा झेलेन्स्की यांनी दिला.

