‘Run for Unity’: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी बाळापूर शहरात आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.

एकात्मतेचा संदेश देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक धावले
बाळापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी बाळापूर शहरात आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
शुक्रवारी सकाळी ७ वाजता बाळापूर शहरातील बाजार चौक परिसरातून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, ठाणेदार प्रकाश झोडगे, शांतता समितीचे अध्यक्ष गजानन महाराज पुरी, सदस्य श्यामराव शेलार, अशोक मंडले, संजय उमाळे, शेख अकरम, आणि अश्वजीत सिरसाट यांच्या हस्ते झेंडा दाखवून या धावण्याच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. मॅरेथॉनचा मार्ग बाजार चौक – अंजुमन रोड – जुनी चावडी – स्टेट बँक रोड असा ठरविण्यात आला होता. ठरलेल्या मार्गावरून धावत मॅरेथॉनचा समारोप पुन्हा बाजार चौकात झाला. यावेळी कमी वेळेत संपूर्ण अंतर पूर्ण करणाऱ्या पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये सुमारे ३०० पोलिस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शहरातील नागरिक आणि शांतता समितीचे सदस्य उत्साहाने सहभागी झाले होते.

