Rules are being flouted at petrol pumps:मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील अनेक पेट्रोल पंप धारकांनी ग्राहकांसाठी बंधनकारक असलेल्या मूलभूत सुविधांचे नियम धाब्यावर बसवले असल्याचे चित्र आहे. अनेक पेट्रोल पंपांवर मोफत हवा व मोफत पाणी उपलब्ध नसल्याचे प्रकार सर्रास दिसून येत असून, याकडे राष्ट्रीय तेल कंपन्या तसेच स्थानिक पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

डोणगाव : मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील अनेक पेट्रोल पंप धारकांनी ग्राहकांसाठी बंधनकारक असलेल्या मूलभूत सुविधांचे नियम धाब्यावर बसवले असल्याचे चित्र आहे. अनेक पेट्रोल पंपांवर मोफत हवा व मोफत पाणी उपलब्ध नसल्याचे प्रकार सर्रास दिसून येत असून, याकडे राष्ट्रीय तेल कंपन्या तसेच स्थानिक पुरवठा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
नियमानुसार प्रत्येक पेट्रोल पंपावर ग्राहकांसाठी काही मूलभूत सुविधा मोफत देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात या सुविधा केवळ कागदोपत्री व फलकापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. परिणामी वाहनचालकांना व ग्राहकांना पेट्रोल पंपावर मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक पंपांवर “तांत्रिक बिघाड” या कारणाखाली मोफत हवा देणारी यंत्रे बंद ठेवली जातात. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे कारण पुढे केले जाते. तर स्वच्छतागृहांची अवस्था इतकी दयनीय आहे की, नाक-तोंड दाबून आत जावे लागते. बहुतेक ठिकाणी सुविधा केवळ फलकावर दिसतात; प्रत्यक्षात मात्र त्या उपलब्ध नसतात.
शासनाने पेट्रोल पंपांवर ग्राहक सुविधा देण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप धारकांवर तेल कंपन्यांकडून कारवाई करून पंपाचा परवाना निलंबित करण्याचा अधिकार आहे. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, ही बाब गंभीर आहे.
डोणगाव येथील पेट्रोल पंपांवर ग्राहकांना वारंवार विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नियमानुसार मोफत मिळणाऱ्या सुविधा दिल्या जात नसतील, तर त्या सुविधा फक्त नावापुरत्याच का ठेवण्यात आल्या आहेत, असा सवाल ग्राहक उपस्थित करत आहेत.
ग्राहकांसाठी बंधनकारक सुविधा
-
पिण्याचे पाणी : प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असणे आवश्यक.
-
स्वच्छ प्रसाधनगृह : स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र व स्वच्छ शौचालये असणे बंधनकारक.
-
मोफत हवा : वाहनांच्या टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध असावी.
-
तक्रार पुस्तिका : ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी तक्रार वही उपलब्ध असणे आवश्यक.
-
अग्निशमन साधने : सुरक्षिततेसाठी वाळूच्या बादल्या व अग्निशामक यंत्रे सुस्थितीत असणे गरजेचे.
हे सर्व निर्बंध तेल कंपन्या व संबंधित पुरवठा विभागाने घालून दिलेले असतानाही त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. परिणामी पेट्रोल पंपांवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी कर्मचारी उद्धटपणे वागतात, तसेच तक्रार पुस्तिका मागितल्यास टाळाटाळ केली जाते, अशीही तक्रार ग्राहकांकडून होत आहे.

