Ruikhed Mayamba :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यांकनासाठी गोंदिया येथून आलेल्या विशेष तपासणी पथकाने १४ मे रोजी सकाळी ९ वाजता रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामांची व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

गोंदिया पथकाची रुईखेड मायंबाला भेट; ग्रामविकास उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी
बबन फेपाळे
रुईखेड मायंबा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यांकनासाठी गोंदिया येथून आलेल्या विशेष तपासणी पथकाने १४ मे रोजी सकाळी ९ वाजता रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामांची व सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने ऑनलाईन नोंदविलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी मूल्यांकन समितीने ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध उपक्रम, मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय कामकाजाची तपासणी केली.
यामध्ये आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, अंगणवाडी, आरओ फिल्टर, स्मशानभूमी तसेच लोकसहभागातून उभारण्यात आलेले १६० बाक (बेंच) यांची पाहणी करण्यात आली. तसेच लोकवर्गणीतून उभारलेली ‘बोलकी शाळा’, विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या स्कूल बॅग, अंगणवाडी परिसरातील पेव्हर ब्लॉक आदी उपक्रमांची माहिती घेऊन समितीने समाधान व्यक्त केले.
यावेळी सरपंच सुरेखा फेपाळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे शाल देऊन स्वागत केले. तपासणीदरम्यान बुलढाणा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अमिता पवार, विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे उपस्थित होते. तसेच गोंदिया पंचायत समितीकडून आलेल्या विशेष पथकात गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, विस्तार अधिकारी प्रकाश कावळे, पंचायत विस्तार अधिकारी ज्ञानेश नाकडे आणि परिचालक गोपाल ठाकूर यांचा समावेश होता.
ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या ३६० घरकुल योजना, सिंचन विहिरी, गुरांचा कोठा, कुक्कुटपालन, स्वच्छता, शिक्षण, डिजिटल दाखले, नागरिकांसाठी शुद्ध आरओ पाणीपुरवठा व इतर मूलभूत सुविधांची समितीने सविस्तर माहिती घेतली.
ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामविकासासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि विकासकामांची प्रत्यक्ष स्थिती यांचे मूल्यांकन समितीने केले. आवश्यक कागदपत्रे, नोंदी आणि विकासकामांची पाहणी करून समितीने समाधान व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संजय इंगळे, उपसरपंच सतीश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नप्ते, ज्ञानेश्वर रामेकर, विकास काकफळे, गणेश फेपाळे, ज्ञानेश्वर नेमणार, पोलीस पाटील, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष अनिल फेपाळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राम औटी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट प्रमुख, आरोग्य सेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

