RTO Akola :शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), अकोला यांच्या वतीने रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वाटप करण्यात आले.

पंढरपूर वारी सुरक्षित व्हावी म्हणून आरटीओची जनजागृती; ६०० वारकऱ्यांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट
पातूर : शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), अकोला यांच्या वतीने रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वाटप करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पातूर येथे राबविण्यात आला. पालखी सोहळ्यात सुमारे ६०० वारकरी सहभागी झाले होते. पायी प्रवास करणारे वारकरी रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सहज दिसावेत आणि अपघात टाळता यावेत, या उद्देशाने त्यांना रिफ्लेक्टिव्ह बेल्टचे वितरण करण्यात आले.
यावेळी ‘रोड सेफ्टी व्हिजन’ या विशेष वाहनाद्वारे वारकरी तसेच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित पायी प्रवास आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमात मोटार वाहन निरीक्षक श्रीमती त्रिवेणी गालींदे, मनोज शेळके, वाहनचालक गजानन सुलताने आणि गौतम अराखराव यांनी सक्रिय सहभाग घेतला.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या या उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांनी स्वागत केले असून, रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी हा उपक्रम प्रभावी व उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

