Road closed : मेहकर-घाटबोरी मुख्य रस्त्याच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे लोणी गवळी येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. संरक्षण भिंतीच्या उभारणीमुळे सुमारे १५० ते १६० शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा एकमेव रस्ता बंद झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पर्यायी रस्ता अथवा पूल उपलब्ध करून न दिल्यास २० जुलैपासून लोणी गवळी-घाटबोरी मार्गावर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दुपदरीकरणाचे काम शेतकऱ्यांच्या अडचणीचे; पर्यायी रस्त्याअभावी आंदोलनाचा पवित्रा
डोणगाव : मेहकर-घाटबोरी मुख्य रस्त्याच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे लोणी गवळी येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. संरक्षण भिंतीच्या उभारणीमुळे सुमारे १५० ते १६० शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा एकमेव रस्ता बंद झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पर्यायी रस्ता अथवा पूल उपलब्ध करून न दिल्यास २० जुलैपासून लोणी गवळी-घाटबोरी मार्गावर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे दुपदरीकरण करताना उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीमुळे शेतात जाणारा पारंपरिक मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पहिल्याच पावसानंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित कंत्राटदार ‘पलसिद्ध कन्स्ट्रक्शन’ यांनी काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत पुढाकार घेत जिल्हाधिकाऱ्यांना ६ जुलै रोजी निवेदन सादर केले. निवेदनात तातडीने पर्यायी रस्ता किंवा पूल उभारण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशांत पाटील यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतात जाण्याचाच मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशासनाने २० जुलैपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यास लोणी गवळी-घाटबोरी मार्गावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतकरी व आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे विकासकामे करताना स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार केला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

