Rahul Gandhi : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या भाषणात ‘एपस्टीन फाइल्स’, अॅडाणी प्रकरण आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचा उल्लेख करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. अॅडाणी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेला खटला प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच असल्याचा दावा करत त्यांनी भाजपच्या आर्थिक संरचनेवर त्याचा परिणाम होईल, असे म्हटले.

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या भाषणात ‘एपस्टीन फाइल्स’, अॅडाणी प्रकरण आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचा उल्लेख करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. अदाणी यांच्यावर अमेरिकेत सुरू असलेला खटला प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच असल्याचा दावा करत त्यांनी भाजपच्या आर्थिक संरचनेवर त्याचा परिणाम होईल, असे म्हटले.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तात्काळ आक्षेप घेत, “आपण केलेले आरोप सिद्ध करावेत; अन्यथा ते सभागृहाच्या नोंदीत जाऊ नयेत,” अशी मागणी केली. यावर राहुल गांधी यांनी तत्काळ पुरावे देण्याची तयारी दर्शवली; मात्र सभापतींनी “मी पुरावे मागितलेले नाहीत, आपण बोलत राहा; नंतर सिद्ध करा,” असे सांगत त्यांना पुढे बोलण्यास सांगितले.
भाषणात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर भारत-अमेरिका व्यापार करार, ऊर्जा सुरक्षितता, अर्थसंकल्प आणि डेटा सुरक्षेबाबतही निशाणा साधला. “सरकारने भारताची ऊर्जा सुरक्षितता अमेरिकेकडे सोपवून पूर्ण शरणागती पत्करली आहे. भाजपचा खजिना वाचवण्यासाठी भारतीयांचे भविष्य धोक्यात घातले,” असा आरोप त्यांनी केला. तसेच अमेरिका आणि चीनची नजर भारतीय नागरिकांच्या डेटावर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांनी पुढे दावा केला की, “केंद्राने भारताला विकले आहे; भारतमातेचा सन्मान धोक्यात घातला आहे.” तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळेच असे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ट्रेड डीलमुळे गरीब शेतकऱ्यांवर संकट येईल, आयात-शुल्कातील बदलांमुळे भारताचे आर्थिक हित बाधित होईल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगात डेटा हीच सर्वात मोठी संपत्ती ठरणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. “देशातील १४० कोटी नागरिकांसमोर मोठे आव्हान उभे आहे. भारतातून निर्माण होणारा डेटा जपणे अत्यंत आवश्यक आहे; कारण आमचे लोक हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, राहुल गांधींच्या विधानांवरून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या विरोधात संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस देण्याचा इशारा दिला असून संध्याकाळी वित्तमंत्र्यांचे उत्तर ऐकण्याचे आवाहनही केले. या घडामोडींमुळे लोकसभेत सरकार आणि विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले.

