Provide teachers: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदाई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, याबाबत पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

धोत्रा नंदाईच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा! शिक्षकाअभावी ११८ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
गजानन भालेकर
धोत्रा नंदाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून विविध योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदाई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. शाळेत कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, याबाबत पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
धोत्रा नंदाई येथील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ११८ आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांना शिकविण्यासाठी पुरेशा शिक्षकांची व्यवस्था नसल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशोक पडघान यांची बायगाव बुद्रुक येथे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर १२ मार्च २०२६ पासून सविता टापरे यांनी तात्पुरत्या स्वरूपात शाळेत सेवा बजावली. त्यांच्यानंतर संतोष काकडे हे महिनाभर शाळेत आले; मात्र, त्यांना बीएलओचे काम देण्यात आल्याने ते देऊळगाव मही येथील शाळेत कार्यरत असल्यामुळे धोत्रा नंदाई येथील विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
शिक्षकांच्या अनियमित उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शासन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध शैक्षणिक आराखडे, संकल्पना आणि योजना राबवीत आहे, तर दुसरीकडे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे यांनी धोत्रा नंदाई येथील शाळेला कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास ग्रामस्थांसह शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेता शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन शाळेत कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे. आता शिक्षण विभाग या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

