Prataprao Jadhav : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी आणि हळद ही पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आरक्षित केलेल्या पाण्याला हात न लावता, प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या शिल्लक पाण्यातून खरीप पिकांना किमान एक वेळ सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय पुढे आला आहे.

प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; तूर, कपाशी, हळद आणि चाऱ्यासाठी प्रकल्पांतील शिल्लक पाणी सोडणार!
बुलढाणा : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी आणि हळद ही पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आरक्षित केलेल्या पाण्याला हात न लावता, प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेल्या शिल्लक पाण्यातून खरीप पिकांना किमान एक वेळ सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय पुढे आला आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतांमधील पिके उभ्या अवस्थेत वाळून गेली आहेत, तर काही ठिकाणी उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत तूर, कपाशी आणि हळद या पिकांना एक वेळ पाणी मिळाल्यास हातात काही प्रमाणात उत्पादन येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. याच अपेक्षेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांची व्यथा आणि खरीप पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रतापराव जाधव यांनी तातडीने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्ह्यातील विविध जलप्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा, पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून त्याव्यतिरिक्त दहा टक्के अतिरिक्त पाणीसाठा राखून ठेवण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचित केले. या सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन केल्यानंतरही प्रकल्पांमध्ये पाणी शिल्लक राहत असल्यास त्यातील काही पाणी शेतकऱ्यांच्या तूर, कपाशी आणि हळद पिकांसाठी उपलब्ध करून देता येईल का, याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण करून उपलब्ध पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन केले. पिण्याच्या पाण्यासाठीचे आरक्षण, बाष्पीभवनामुळे होणारी घट आणि अतिरिक्त दहा टक्के पाणीसाठा राखून ठेवल्यानंतर उर्वरित शिल्लक पाण्यातून खरीप पिकांना सिंचनासाठी पाणी देता येणे शक्य असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तूर, कपाशी, हळद तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका!
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना केवळ आश्वासन न देता उपलब्ध जलसंपत्तीचे नियोजन करून प्रत्यक्ष दिलासा देण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधत त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरत आहे. या निर्णयामुळे पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, प्रकल्पांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांनी अत्यंत काटकसरीने वापर करावा. हे पाणी केवळ तूर, कपाशी, हळद आणि चाऱ्यासाठीच वापरावे. रब्बी हंगामातील पिकांसाठी या पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

