elections on hold!: राज्यातील बहुतेक नगरपरिषदा दोन डिसेंबर रोजी मतदानाला जाणार असताना, पातूर नगर परिषदेची निवडणूक मात्र ‘थांबवण्यात’ आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाचे एक महत्त्वपूर्ण पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सध्या प्रलंबित असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पातूरमधील नवखे तसेच आजी-माजी उमेदवारांना आता निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

न्यायालयीन प्रकरणामुळे उमेदवारांच्या आशांवर विरजण; निवडणूक आयोगाचे पत्र व्हायरल
संजय गोतरकर
पातूर : राज्यातील बहुतेक नगरपरिषदा दोन डिसेंबर रोजी मतदानाला जाणार असताना, पातूर नगर परिषदेची निवडणूक मात्र ‘थांबवण्यात’ आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाचे एक महत्त्वपूर्ण पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे पातूर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सध्या प्रलंबित असल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पातूरमधील नवखे तसेच आजी-माजी उमेदवारांना आता निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी निखिल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली पातूर नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. दहा प्रभागांसाठी २० सदस्यांची निवड होणार असून, अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले होते. यावेळी इच्छुक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मागील अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेली नगर परिषद यंदा निवडणुकीकडे वाटचाल करणार, अशी अपेक्षा होती. मात्र न्यायालयीन प्रकरणाच्या गुंत्यात ही प्रक्रिया अडकली आहे.
निवडणूक आयोगाचे पत्र समोर आल्यानंतर शहरात विविध अफवांचा जोर वाढला आहे. अनेक नवखे तसेच आजी-माजी उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी केली होती. मात्र आता त्यांच्या स्वप्नांवर काही काळासाठी विरजण पडले आहे. या पत्रामुळे नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात राजकीय चर्चेला उधाण आले असून, मतदारही संभ्रमात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पातूर नगर परिषदेची मतदार यादी अद्याप अंतिम झालेली नसल्याने निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी २१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतरच निवडणुकीबाबत मार्गदर्शन आणि सूचना जारी केल्या जातील.
दरम्यान, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवू नये. निवडणुकीसंदर्भातील अधिकृत सूचना निवडणूक आयोगाकडूनच जाहीर केल्या जातील.”

