Mahabreaking

[breaking_news]

Additional Tehsil Office: साखरखेर्ड्यात अप्पर तहसील कार्यालयाचा मार्ग मोकळा; ग्रामपंचायत अधिकारी निवासस्थानाची पाहणी

Additional Tehsil Office: साखरखेर्डा येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयासाठी जागेची पाहणी आज उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केली. तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत अधिकारी निवासस्थानाची जागा कार्यालयासाठी योग्य असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे लवकरच साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Tehsil Office

  तालुक्याच्या मागणीला अखेर बळ; साखरखेर्ड्यात लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयासाठी जागेची पाहणी आज उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केली. तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायत अधिकारी निवासस्थानाची जागा कार्यालयासाठी योग्य असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे लवकरच साखरखेर्डा येथे अप्पर तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तालुका निर्मितीसाठी वसंतराव मगर यांनी खांद्यावर पताका घेऊन अनेक वेळा शिष्टमंडळ मुंबई येथे नेऊन शासनाकडे मागणी रेटली होती. सहकार महर्षी कै. भास्करराव शिंगणे यांनीही शिष्टमंडळाला पाठिंबा देत त्यावेळी तालुका निर्मितीची मागणी लावून धरली होती.

तत्कालीन आमदार तोताराम कायंदे यांनीही अनेकदा पत्रव्यवहार करून तालुका निर्मितीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील विधानसभा सभागृहात सातत्याने प्रश्न उपस्थित करून साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणीची ज्योत तेवत ठेवली. या मागणीसाठी उपोषण, रास्ता रोको यांसह विविध स्वरूपाची आंदोलने करण्यात आली.

या आंदोलनात कै. अप्पासाहेब देशमुख, कै. सखाराम हाडे, कै. एस. एम. बेंडमाळी, कै. भगवान पाटील, कै. भाऊसाहेब सावजी, रविंद्र पाटील, रामभाऊ जाधव, कै. आत्माराम बापू खरात, रंगनाथ डोईफोडे मामा, बंद्रीभाऊ वाघ, दामुआण्णा शिंगणे, शिवदास रिंढे, मदन जैस्वाल, तेजराव बापू देशमुख, मनोहर तुपकर, पत्रकार कै. भोजराज गाडेकर, पत्रकार अशोक इंगळे, कै. युसुफ सेठ कुरेशी, सय्यद रफीक, चंद्रशेखर शुक्ल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

साखरखेर्डा तालुका निर्मितीची मागणी सातत्याने लावून धरण्यात आली. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही या मागणीसाठी पाठपुरावा करून विधिमंडळात अहवाल सादर केला होता. अनेक वेळा शासनाकडून नवीन तालुक्यांची निर्मिती करताना साखरखेर्ड्याचे नाव अग्रक्रमावर राहील, असे आश्वासन देण्यात आले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुका निर्मितीऐवजी अप्पर तहसील आणि अप्पर जिल्हाधिकारी अशी प्रशासकीय विभागणी करून साखरखेर्डा परिसरातील जनतेला दिलासा दिला आहे. साखरखेर्डा अप्पर तहसीलमध्ये साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे स्थानिक पातळीवर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार, एक नायब तहसीलदार, तीन कर्मचारी आणि एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. आज जागेची पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी निवासस्थानाची डागडुजी व रंगरंगोटी करून कार्यालयासाठी सुसज्ज व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण वऱ्हाडे, ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पोंधे, संजय शिंगणे, लखन राजपूत, शिवानंद वाकदकर, आनंद राजपूत आणि ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top