job fair : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील नामांकित खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाडेगाव येथे ११ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, त्यापैकी ७७ युवक-युवतींची विविध पदांसाठी निवड करण्यात आली.
.
१२२ उमेदवारांच्या मुलाखती, ७७ जणांना रोजगाराची संधी; वाडेगावातील रोजगार मेळावा ठरला फलदायी
राहुल सोनोने
वाडेगाव : नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींना स्थानिक तसेच इतर जिल्ह्यांतील नामांकित खासगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमूहांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाडेगाव येथे ११ ऑगस्ट २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२२ उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, त्यापैकी ७७ युवक-युवतींची विविध पदांसाठी निवड करण्यात आली.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला, मॉडेल करिअर सेंटर, अकोला आणि श्री. जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. विविध उद्योजकांकडे उपलब्ध असलेल्या ९१ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सहभागी उद्योग प्रतिनिधी आणि त्यांच्या कंपन्यांमधील उपलब्ध रोजगाराच्या संधींबाबत उमेदवारांना माहिती देण्यात आली. विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास प्रफुल्ल सु. शेळके होते. यावेळी श्री. जागेश्वर विद्यालयाचे सचिव डॉ. हिम्मतराव घाटोळ, उपाध्यक्ष वा. ना. फाळके, मुख्याध्यापक गोपाल मानकर, कौशल्य विकास अधिकारी नागेश देशपांडे, पूनम रजानें आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुहास महाले यांनी केले.

