Outrage over Solar Project: तालुक्यातील बोर्टा येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून ग्रामस्थ आणि संबंधित कंपनी यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून शेतकऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या शेतजमिनीत लोखंडी खांब रोवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर आश्वासनभंगाचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचांची तक्रार
संजय उमक
मूर्तिजापूर : तालुक्यातील बोर्टा येथे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पावरून ग्रामस्थ आणि संबंधित कंपनी यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीकडून शेतकऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या शेतजमिनीत लोखंडी खांब रोवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याप्रकरणी ग्रामपंचायत बोर्टाचे सरपंच पंकज ओंकारराव सावळे यांनी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला आहे. मौजा बोर्टा येथील ई-क्लास जमीन गट क्रमांक ९९ व १०६ या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून वेगाने सुरू आहे. मात्र, या कामादरम्यान परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतात कंपनीने कोणतीही लेखी किंवा तोंडी परवानगी न घेता थेट लोखंडी पोल गाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतजमिनीचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत शेतकऱ्यांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला आहे. विशेष म्हणजे, १५ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी या विरोधात उपोषण सुरू केले होते. त्या वेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर तसेच तहसीलदार मूर्तिजापूर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनानंतरही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट प्रकल्पाचे काम सुरूच ठेवण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी अधिकच वाढली आहे. यामुळे संबंधित कंपनीने दिलेल्या आश्वासनाचा भंग केल्याचा आरोप सरपंच सावळे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कंपनीला शेतकऱ्यांच्या शेतात बेकायदेशीररीत्या रोवलेले लोखंडी खांब काढण्याचे आदेश द्यावेत, तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, येत्या १ मे पासून गावकरी पुन्हा एकदा सौर प्रकल्पाच्या ठिकाणी सामूहिक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

