Onion Seeds : तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनीमधून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचे कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुब्बूजी इंडस्ट्रीतून १४ बॅग कांदा बियाण्यांची चोरी; तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनीमधून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचे कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६, रा. महात्मा फुले रोड, भाजीमंडी, देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी हे सिडस् कंपनीशी संबंधित असून, प्रोसेसिंगसाठी आणण्यात आलेले अथर्व सिड्स कंपनीचे कांदा बियाणे जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री परिसरात ठेवण्यात आले होते.
२४ मे २०२६ रोजी रात्री ११.३८ ते २५ मे रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनी परिसरातून एकूण १४ बॅग कांदा बियाणे चोरून नेल्याचे समोर आले. चोरीस गेलेल्या मालामध्ये प्रत्येकी ३३ किलो वजनाच्या सात बॅग, किंमत १ लाख ६१ हजार ७०० रुपये तसेच प्रत्येकी ६२ किलो वजनाच्या सात बॅग, किंमत ३ लाख ३ हजार ८०० रुपये असा एकूण ६ क्विंटल ६५ किलो वजनाचा माल समाविष्ट आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत ४ लाख ६५ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक २५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ अंतर्गत तीन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

