Nimbi Malokar murder : निंबी मालोकार येथील शेतशिवारात शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अमोल गजानन मालोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. या खून प्रकरणाचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावत पाच आरोपींना जेरबंद केले. आरोपींमध्ये मृतकाचे चुलत भाऊ तसेच त्यांच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेतरस्त्याच्या वादातून चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या; अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
बाळापूर : निंबी मालोकार येथील शेतशिवारात शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून अमोल गजानन मालोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. या खून प्रकरणाचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या नऊ तासांत छडा लावत पाच आरोपींना जेरबंद केले. आरोपींमध्ये मृतकाचे चुलत भाऊ तसेच त्यांच्या साथीदारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मालोकार हे शेतात असताना त्यांचे चुलत भाऊ अजय मालोकार, विजय मालोकार व त्यांच्या साथीदारांनी शेतातील रस्त्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. या वादातून आरोपींनी बंदुकीने अमोल यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मृतकाचे भाऊ उमेश गजानन मालोकार यांनी पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, जुने शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पितांबर जाधव व बाळापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली.
जखमी असल्याचे समजताच पुन्हा गोळ्या झाडल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्या हल्ल्यानंतर अमोल मालोकार जखमी अवस्थेत असल्याचे आरोपींना समजले. त्यानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी आले आणि ज्ञानेश्वर मालोकार यांच्या समक्ष अमोल यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडून पसार झाले, अशी माहिती ज्ञानेश्वर यांनी पोलिसांना दिली.दरम्यान, विजय मालोकार यानेच पोलिसांना खुनाची माहिती दिल्याचा बनाव करून तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केल्याचे तांत्रिक तपासातून समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी या प्रकरणातील घटनाक्रमाचा उलगडा करण्यास सुरुवात केली.
तीन पथकांनी घेतला आरोपींचा शोध
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. यावेळी गुन्हा करून पसार होण्याच्या तयारीत असलेले विजय मालोकार, विजय बुटे आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला उमरी परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, अजय श्रीकृष्ण मालोकार आणि त्याचा साथीदार राजकुमार शिवचरण मालोकार हे वाहनाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तातडीने त्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करत दोघांना देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे मध्यरात्री ताब्यात घेतले.
पाच आरोपी ताब्यात; वाहने व रोख रक्कम जप्त
या प्रकरणात विजय श्रीकृष्ण मालोकार (३३), अजय श्रीकृष्ण मालोकार (३२), राजकुमार शिवचरण मालोकार (२५), विजय कैलास बुटे (३०) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी आरोपींकडून एक स्विफ्ट डिझायर, एक एर्टिगा आणि एक बुलेट मोटारसायकल, पाच मोबाईल फोन तसेच १ लाख ७,७६० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.अटक आरोपींना पुढील तपासासाठी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व शस्त्र अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण, वापरण्यात आलेले शस्त्र आणि प्रत्येक आरोपीची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण, विष्णू बोडखे, अनिल चव्हाण यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

