NEET Exam Paper Leaked : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा धक्का देणारा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा NTA ने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालानंतर नीटचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थ्यांना मोठा धक्का; नव्या तारखा लवकरच जाहीर होणार
नवी दिल्ली : देशभरातील लाखो वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा धक्का देणारा निर्णय राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा NTA ने सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या अहवालानंतर नीटचा पेपर फुटल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने १० मे रोजी जारी केलेल्या पत्रकानंतर ८ मे २०२६ रोजी संबंधित प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडे माहिती पाठविण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्राप्त अहवाल, तपासातील निष्कर्ष आणि कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता धोक्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने केंद्र सरकारच्या मंजुरीने हा निर्णय घेण्यात आल्याचे NTA ने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. NTA कडून चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी आणि सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचा त्रास मान्य; तरीही विश्वास जपण्यासाठी निर्णय
NTA ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, परीक्षा पुन्हा घेण्यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागेल याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. मात्र राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य होता. अन्यथा भविष्यात परीक्षा प्रक्रियेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला असता, असेही नमूद करण्यात आले आहे.
नव्याने अर्ज करण्याची गरज नाही
महत्त्वाची बाब म्हणजे मे २०२६ सत्रासाठी विद्यार्थ्यांनी केलेली नोंदणी, परीक्षा केंद्रांची निवड आणि उमेदवारी पुढील पुनर्परीक्षेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करण्यात येणार असल्याची माहिती NTA ने दिली आहे.
नव्या तारखा लवकरच
पुनर्परीक्षेच्या तारखा, नवीन प्रवेशपत्र वितरणाचे वेळापत्रक आणि पुढील सूचना NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर व अधिकृत माध्यमांद्वारे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.विद्यार्थी व पालकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 011-40759000 / 011-69227700 तसेच neet-ug@nta.ac.in हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

