Maulana Ismail Ashaati :आजच्या काळात देश व समाजातील परिस्थिती प्रत्येक सजग व्यक्तीला विचार करायला भाग पाडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने घाबरण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी संयम, शहाणपण आणि जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन शहरातील कागदीपूरा मशिदीत इमाम मौलाना इस्माईल अशाअती यांनी केले. ते जुम्मा नमाजच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.

जुम्मा नमाजमध्ये सद्यस्थितीवर विचारप्रवर्तक भाषण!
ज़ाकीर अहमद
बाळापूर : आजच्या काळात देश व समाजातील परिस्थिती प्रत्येक सजग व्यक्तीला विचार करायला भाग पाडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने घाबरण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी संयम, शहाणपण आणि जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन शहरातील कागदीपूरा मशिदीत इमाम मौलाना इस्माईल अशाअती यांनी केले. ते जुम्मा नमाजच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.
मौलाना अशाअती यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अल्लाह आपल्या बंद्यांची विविध प्रकारे परीक्षा घेतो. या परीक्षा म्हणजेच ईमान मजबूत करण्याचे आणि माणसाच्या संयम व चिकाटीची कसोटी पाहण्याचे साधन असते. त्यांनी कुरआन व हदीसच्या आधारे पैगंबरांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले आणि म्हटले की इतिहास साक्षी आहे की प्रत्येक पैगंबराला कठीण परीक्षा व संकटांचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी संयम, विश्वास आणि अल्लाहवरील पूर्ण भरोशाने त्या परिस्थितींना सामोरे गेले.
त्यांनी हजरत इब्राहीम (अ.स.), हजरत अय्यूब (अ.स.) आणि इतर पैगंबरांच्या परीक्षांचे उदाहरण देत सांगितले की, जेव्हा अल्लाहचे निवडक बंदेही परीक्षेतून गेले आहेत, तेव्हा आपणही सध्याच्या परिस्थितीत ठाम राहिले पाहिजे. त्यांनी मुस्लिमांना सल्ला दिला की त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करावी, नमाज नियमित अदा करावी, एकता व ऐक्य मजबूत करावे आणि समाजात शांतता, बंधुता व सद्भावना वाढवावी.
मौलाना इस्माईल अशाअती यांनी पुढे सांगितले की सध्याच्या परिस्थितीत संयम, प्रार्थना आणि सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. अफवांपासून दूर राहावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा आदर करत देशाच्या प्रगती व शांततेसाठी प्रार्थना करावी. भाषणाच्या शेवटी त्यांनी लोकांना आवाहन केले की त्यांनी धर्माच्या शिकवणीचे पालन करावे, नैतिक मूल्ये बळकट करावीत आणि येणाऱ्या पिढ्यांच्या चांगल्या संस्कारांवर विशेष लक्ष द्यावे. या प्रसंगी मोठ्या संख्येने नमाजी उपस्थित होते आणि त्यांनी मौलानांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले.

