Monkey jumps : डोणगाव परिसरात सध्या माकडांचा उच्छाद वाढला असून, जंगली माकडांसह लाल तोंडाच्या माकडांनी नागरिकांना त्रस्त केले आहे. विशेषतः महिला व लहान बालकांमध्ये माकडांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच माकडाने अंगावर उडी मारल्याने खाली पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा धास्तीमुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.

डोणगावात माकडांचा उच्छाद; हल्ल्याने धास्तावलेल्या वृद्धाचा मृत्यू
डोणगाव : डोणगाव परिसरात सध्या माकडांचा उच्छाद वाढला असून, जंगली माकडांसह लाल तोंडाच्या माकडांनी नागरिकांना त्रस्त केले आहे. विशेषतः महिला व लहान बालकांमध्ये माकडांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच माकडाने अंगावर उडी मारल्याने खाली पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा धास्तीमुळे मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.
डोणगाव येथील रेहमतनगर परिसरात राहणारे लालखा खासाब हे सुमारे महिनाभरापूर्वी घरासमोर असताना एका लाल तोंडाच्या माकडाने त्यांच्या अंगावर अचानक उडी मारली. त्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती कायम राहिली.
दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. माकडाच्या हल्ल्यानंतर धास्तावलेल्या अवस्थेत असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या डोणगावातील विविध भागांत माकडांचा वावर वाढला असून, ही माकडे अचानक नागरिकांच्या अंगावर झेपावत असल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माकडे कधी कोणावर हल्ला करतील, याचा नेम नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
माकडांच्या वाढत्या उपद्रवाची वन विभागाने तातडीने दखल घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डोणगाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

