incomplete repairs : शहरालगतच्या सागवान परिसरातील गोडे कॉलेजजवळील पूर्भे लेआउटमध्ये महावितरणकडून ९ ऑगस्ट रोजी विद्युत पोल उभारण्याचे काम करण्यात आले. पोल उभारण्यासाठी विविध ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मात्र, हे काम सुरू असताना ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने परिसरातील नागरिकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाईपलाईन फुटून महिनाभराचा कालावधी उलटला तरी तिची दुरुस्ती पूर्ण झालेली नसून, रस्त्यालगतचा धोकादायक खड्डाही अद्याप कायम आहे.

पाईपलाईन फुटली, पाणीपुरवठा विस्कळीत; महिनाभरापासून धोकादायक खड्डा कायम
बुलढाणा : शहरालगतच्या सागवान परिसरातील गोडे कॉलेजजवळील पूर्भे लेआउटमध्ये महावितरणकडून ९ ऑगस्ट रोजी विद्युत पोल उभारण्याचे काम करण्यात आले. पोल उभारण्यासाठी विविध ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मात्र, हे काम सुरू असताना ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने परिसरातील नागरिकांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाईपलाईन फुटून महिनाभराचा कालावधी उलटला तरी तिची दुरुस्ती पूर्ण झालेली नसून, रस्त्यालगतचा धोकादायक खड्डाही अद्याप कायम आहे.
पाईपलाईन फुटल्यानंतर नागरिकांनी महावितरणकडे वारंवार दुरुस्तीची मागणी केली. मात्र, पाईपलाईन दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत महावितरणकडून ग्रामपंचायतीकडे बोट दाखविण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी ग्रामपंचायतीकडेही वारंवार तक्रारी केल्या.
ग्रामपंचायतीने पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणी बूच मारून पाणीपुरवठा बंद केला. परिणामी पुढील भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतर पाईपलाईनची अर्धवट जोडणी करण्यात आली; मात्र ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली होती, तेथील मोठा खड्डा अद्याप बुजविण्यात आलेला नाही. पाईपलाईनचे कामही पूर्ण झालेले नसल्याने पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.
खड्ड्यात साचते पाणी; अपघाताचा धोका
मोठा खड्डा तसाच असल्याने त्यात पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून ही परिस्थिती कायम असून, महावितरण आणि ग्रामपंचायत या दोन्ही विभागांकडून समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय
पाईपलाईन ज्या ठिकाणी अर्धवट जोडण्यात आली आहे, त्या ठिकाणी नळाला पाणी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून वाया जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार माहिती देऊनही मनुष्यबळ कमी असल्याचे कारण सांगून दुरुस्तीचे काम पुढे ढकलले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जबाबदारी एकमेकांवर
महावितरण आणि ग्रामपंचायत या दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याने प्रत्यक्ष त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. एकीकडे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, तर दुसरीकडे रस्त्यालगतचा मोठा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे.
त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने पाईपलाईनची पूर्ण दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करावा तसेच धोकादायक खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
महावितरण की ग्रामपंचायत; अपघातास जबाबदार कोण?
रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजूला खोदलेले खड्डे अपघाताला कारणीभूत ठरण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. काही ठिकाणी अशा खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवही गमवावा लागला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अशा धोकादायक खड्ड्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.
सागवानमधील पूर्भे लेआउटमधील खड्डा महावितरणने विद्युत पोल उभारण्यासाठी खोदला. त्यानंतर पाईपलाईन फुटल्याने ग्रामपंचायतीने अर्धवट दुरुस्ती केली; मात्र खड्डा अद्याप तसाच आहे. त्यामुळे भविष्यात या खड्ड्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“पूर्भे लेआउटमधील समस्येबाबत माहिती मिळाली होती. प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन पाहणी करण्यात येईल. परिस्थिती पाहून तत्काळ समस्या सोडविण्यात येईल.”
— देवेंद्र बरडे, ग्रामपंचायत अधिकारी, सागवान
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

