Mahabreaking

[breaking_news]

promise of marriage :लग्नाचे आमिष दाखवून दीड लाखांचा गंडा; नवरी दोन दिवसांत पसार, धाड पोलिसांनी दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या!

promise of marriage : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या अपेक्षेने विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाला अवघ्या दोन दिवसांत नवरीने घरातून पळ काढत धक्का दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने धाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी प्रथम मध्यस्थ आरोपीला अटक केली. त्यानंतर मुख्य महिला आरोपीचा शोध घेत तिला छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने अटक केली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

promise of marriage

बनावट लग्नाच्या जाळ्यात तरुणाला अडकविले; दीड लाखांची फसवणूक करणाऱ्या महिला आरोपीला संभाजीनगरातून अटक

पंडित सावळे

मासरूळ  : विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोठ्या अपेक्षेने विवाहबंधनात अडकलेल्या तरुणाला अवघ्या दोन दिवसांत नवरीने घरातून पळ काढत धक्का दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने धाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी प्रथम मध्यस्थ आरोपीला अटक केली. त्यानंतर मुख्य महिला आरोपीचा शोध घेत तिला छत्रपती संभाजीनगर येथून शिताफीने अटक केली. या प्रकरणातील दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

विवाह जुळविण्याच्या नावाखाली दीड लाखांचा व्यवहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन राजाराम देवकर (वय २९, रा. धामणगाव, ता. जि. बुलढाणा) यांनी ६ सप्टेंबर २०२६ रोजी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नारायण किसन आंधळे (रा. अंढेरा, ता. देऊळगाव राजा) याने मोहन देवकर यांना सविता अण्णा सांगळे (रा. लातूर) या महिलेचा फोटो मोबाईलद्वारे दाखविला होता. तिच्यासोबत विवाह जुळवून देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते.

त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी श्री मर्दडी देवी संस्थान, दुधा येथे मोहन देवकर आणि सविता सांगळे यांचा विवाह पार पडला. विवाहानंतर नव्या संसाराची स्वप्ने रंगवत असलेल्या देवकर यांना मात्र अवघ्या दोन दिवसांत मोठा धक्का बसला. सविता सांगळे ही धामणगाव येथील त्यांच्या राहत्या घरातून अचानक निघून गेली. त्यानंतर ती परत न आल्याने आणि घडलेल्या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे देवकर व त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले.

अंढेरा येथून मध्यस्थ आरोपीला अटक; २१ दिवस कारागृहात

या तक्रारीवरून धाड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८ (४), ६१ (२) व ३ (५) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची जबाबदारी पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमाने यांच्याकडे सोपविण्यात आली.

तपासादरम्यान पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमाने आणि सहाय्यक फौजदार शांताराम जाधव यांनी हालचाली करीत पहिला आरोपी नारायण किसन आंधळे याला अंढेरा पोलीस हद्दीतून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या आरोपीला तब्बल २१ दिवस कारागृहात राहावे लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुख्य महिला आरोपीचा छत्रपती संभाजीनगरातून शोध

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य महिला आरोपी सविता अण्णा सांगळे हिचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तिचा शोध सुरू ठेवला. याचदरम्यान ती परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमाने यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी नियोजनपूर्वक तपासाची दिशा बदलली. विवाहासाठी इच्छुक वर असल्याचे सांगून त्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे आमिष मोबाईलद्वारे महिला आरोपीला दाखविण्यात आले. या माहितीच्या आधारे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमाने आणि सहाय्यक फौजदार शांताराम जाधव यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

संभाजीनगरातून शिताफीने अटक; दोन्ही आरोपी कारागृहात

या नियोजनबद्ध कारवाईदरम्यान ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सविता सांगळे हिला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी विश्वासात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर तिला संबंधित गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनुसार तिची कारागृहात रवानगी करण्यात आली.

अशा प्रकारे विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक केल्याच्या या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून कारागृहात पाठविण्यात धाड पोलिसांना यश आले आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल समाधान देशमाने आणि सहाय्यक फौजदार शांताराम जाधव यांनी केली. विवाह जुळविताना केवळ ओळखीच्या व्यक्तीवर विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीची आणि विवाह जुळवून देणाऱ्यांची योग्य पडताळणी करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top