Mahabreaking

[breaking_news]

Kamalja Mata temple :कमळजा माता मंदिरासाठी लोणार पेटले! प्रशासनाविरोधात विराट चक्काजाम; सर्वपक्षीय नेते रस्त्यावर

Kamalja Mata temple : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन कमळजा माता मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिराचे संरक्षण आणि लोणार सरोवराचे अस्तित्व वाचविण्यासाठी प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात लोणार शहरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली.

Kamalja Mata

मंदिर पाण्याखाली, प्रशासन निद्रिस्त? लोणारमध्ये तासभर चक्काजाम; बेमुदत आंदोलनाचा इशारा

भागवत चव्हाण

कारेगाव  : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने ऐतिहासिक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्राचीन कमळजा माता मंदिर पूर्णतः पाण्याखाली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिराचे संरक्षण आणि लोणार सरोवराचे अस्तित्व वाचविण्यासाठी प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात लोणार शहरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने विराट चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली.

सकाळी १० वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली. कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी आणि सरोवरातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

‘कमळजा माता मंदिर वाचवा’च्या घोषणांनी परिसर दणाणला

आंदोलनात सहभागी नागरिकांच्या हातात ‘कमळजा माता मंदिर पाण्याबाहेर काढा’, ‘कमळजा माता मंदिर वाचवा’ आणि ‘लोणार सरोवर वाचवा’ अशा मागण्यांचे फलक होते. घोषणाबाजी करत आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष मंदिराच्या संरक्षणाच्या प्रश्नाकडे वेधले.

लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत तसेच माता-भगिनींनीही आंदोलनात सहभाग घेतला. विविध वयोगटातील नागरिकांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन आपला निषेध नोंदविला. त्यामुळे आंदोलनाला व्यापक लोकसहभाग लाभल्याचे दिसून आले.

सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर

कमळजा माता मंदिर आणि लोणार सरोवराच्या संरक्षणासाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते व प्रमुख पदाधिकारी आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले. सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकाऱ्यांची आक्रमक उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून पुरातत्त्व विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या कथित संथ कारभारावर टीका केली. ऐतिहासिक मंदिर आणि सरोवराच्या संवर्धनासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

सरोवरातील वाढत्या पाण्यामुळे जैवविविधतेला धोका?

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सरोवरात बाहेरून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम केवळ कमळजा माता मंदिरावरच नव्हे, तर लोणार सरोवराच्या वैशिष्ट्यपूर्ण अल्कधर्मी जैवविविधतेवर आणि सभोवतालच्या परिसरावरही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

सरोवरातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक उपाययोजना कराव्यात. मंदिराचे संरक्षण करण्याबरोबरच सरोवराच्या नैसर्गिक रचनेचे आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

वाहतूक ठप्प; अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

चक्काजाम आंदोलनामुळे लोणार शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

आंदोलकांनी प्रशासनाकडे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मंदिराच्या संरक्षणासाठी आणि सरोवरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत सरोवरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आणि बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल.

लोणार सरोवराचा ऐतिहासिक वारसा, मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय संवर्धन यांचा विचार करून शासन व प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने केली आहे. आता प्रशासन या मागण्यांवर कोणती कार्यवाही करते, याकडे लोणार शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top