Mahabreaking

[breaking_news]

Livestock :चारा-पाण्याच्या टंचाईने पशुधन धोक्यात; दुधा बाजारात विक्रीसाठी गुरांची वाढली आवक

Livestock : बुलढाणा तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीप पिकांसह आता चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनाची चिंता वाढली आहे. त्यातच पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शासनाने बुलढाणा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असले, तरी प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

Livestock

दुष्काळाची झळ पशुधनालाही; नाईलाजाने शेतकऱ्यांचा जनावरे विक्रीकडे कल

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे खरीप पिकांसह आता चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उत्पादनाची चिंता वाढली आहे. त्यातच पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. शासनाने बुलढाणा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले असले, तरी प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

बुलढाणा तालुक्यातील दुधा येथे दर शनिवारी पशुधनाचा मोठा बाजार भरतो. यंदा चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे या बाजारात विक्रीसाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांच्या संख्येत बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, बाजारात जनावरांची आवक असतानाही खरेदीदारांची संख्या अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत आहे.

बाजारात आवक मोठी; खरेदी मात्र मोजकीच

दुधा येथील पशुधन बाजारात सध्या आठवड्याला अंदाजे ७० ते ७५ बकऱ्या, ४५ ते ५० म्हशी, सुमारे ३५ गायी आणि १२५ ते १५० बैल विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० ते १५ जनावरांचीच खरेदी होत असल्याचे चित्र आहे.

बाजारात जनावरांच्या किमतीही त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आहेत. बैलांची किंमत साधारण १ लाख २५ हजार ते १ लाख ३० हजार रुपये, म्हशींची ८० हजार ते १ लाख ३० हजार रुपये, गायींची ७० ते ८० हजार रुपये, तर बकऱ्यांची १५ ते २५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या दराने जनावरे खरेदी करण्यासाठी प्रामुख्याने व्यापारीच पुढे येत असून, स्थानिक कास्तकारांकडून जनावरांची खरेदी होताना फारसे दिसत नाही.

चारा-पाण्याअभावी नाईलाजाने विक्री

पशुधनासाठी दररोज चारा उपलब्ध करून देणे आणि पाण्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, जनावरांचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने काही शेतकरी नाईलाजाने आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारातील व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पशुधनाची आवक आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार तुलनेने मोठ्या प्रमाणात होत होते. यंदा मात्र चारा-पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांची आर्थिक अडचण आणि खरेदीदारांची घटलेली संख्या यामुळे बाजारातील उलाढाल मंदावल्याचे चित्र आहे.

चाऱ्यासाठी शाळू पेरणीचा आधार

दरम्यान, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि चाऱ्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन काही शेतकऱ्यांनी जनावरांसाठी शाळू पेरणीला सुरुवात केली आहे. पावसाचा भरवसा नसतानाही किमान पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, या आशेने शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

पुढील काळात पाऊस पडेल की नाही, याची शाश्वती नसली तरी पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावेच लागत आहेत. खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने शाळूची पेरणी केली जात आहे.

दुष्काळी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी

खरीप हंगामातील परिस्थितीच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. मात्र, पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने शासनाने दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

विशेषतः पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चारा उपलब्ध करून देणे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

“जनावरांचा चारा तरी होईल, अशी आशा”

“पुढे पावसाचा भरवसा नसला तरी शेतकरी हातावर हात ठेवून बसू शकत नाही. खरीप हंगामातील नुकसान झाल्यानंतर आता जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शाळूची पेरणी केली जात आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे,” अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

“पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तातडीने पाण्याची व्यवस्था करावी”

“चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी पाणीच नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. शासनाने जनावरांच्या पाण्याची सोय करून पशुधन वाचवावे. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांच्या हातात काहीतरी मदत द्यावी.”

— प्रदीप राधाकिसन शिंदे, शेतकरी, रुईखेड मायंबा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top