Chikhla Kakad :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणामुळे निर्माण झालेली चिखला येथील तणावपूर्ण परिस्थिती आता हळूहळू निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

रमेश खंडागळे
बीबी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणामुळे निर्माण झालेली चिखला येथील तणावपूर्ण परिस्थिती आता हळूहळू निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
चिखला काकड येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात वनव्यासारखे पसरले. विविध ठिकाणी बंद पाळून नागरिकांनी निषेध व्यक्त केला. घडलेल्या प्रकारामुळे गावाला काही काळ पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. संचारबंदी लागू करण्यात आल्याने गावात तणावपूर्ण शांतता पसरली होती.
सध्या सुमारे ६० टक्के घरांना कुलूपे असून काही घरांचे दरवाजे आतून बंद असल्याचे दिसून येते. नागरिक घराबाहेर कमी प्रमाणात पडताना दिसत आहेत. घटनेनंतर काही कुटुंबे मुलाबाळांसह बाहेरगावी गेल्याने गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या उपस्थितीवरही परिणाम झाला आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या १२१ आहे. घटनेपूर्वी शंभर टक्के उपस्थिती होती. मात्र घटनेनंतर पहिल्या दिवशी केवळ ५ विद्यार्थी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी २०, तिसऱ्या दिवशी ४१, तर आज ५५ विद्यार्थी शाळेत हजर होते, अशी माहिती एका शिक्षकाने दिली. या व्यतिरिक्त शाळेवर इतर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गावात अद्यापही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती हळूहळू सुरळीत होत असल्याचे चित्र दिसत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी बाहेरील लोकांनी येऊन वातावरण बिघडवू नये, अशी भावना व्यक्त केली. “आम्हाला गावात पिढ्यान् पिढ्या राहायचे आहे. आमचे प्रश्न आम्हालाच सोडवू द्यावेत. त्यासाठी गावकरी प्रयत्न करत असून प्रशासनही योग्य सहकार्य करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

