Mahabreaking

[breaking_news]

Satish Kayande :अनुभवसंपन्न शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रे व व्यवहारज्ञान आत्मसात करा : सतीश कायंदे

Satish Kayande : विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांकडून शेतीतील अनेक पारंपरिक व उपयुक्त बाबी शिकण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील अनुभवसंपन्न शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रे व व्यवहारज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांनी केले.

Satish Kayande

सावखेड भोई येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन संपन्न

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांकडून शेतीतील अनेक पारंपरिक व उपयुक्त बाबी शिकण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील अनुभवसंपन्न शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रे व व्यवहारज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचालित समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन सावखेड भोई येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

Satish Kayande
सतीश कायंदे यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ग्रामस्थांना करून द्यावी. अशा उपक्रमांमधून समाजकार्याची जाणीव अधिक दृढ होते आणि समाजाप्रती असलेले आपले योगदान प्रभावीपणे पार पाडण्याची संधी मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सतीश कायंदे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून दादाराव मुसदवाले, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा तसेच संजय मुंदानकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सावखेड भोई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी केले. प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी सांगितले की, शालेय व महाविद्यालयीन जीवनात ते स्वतः राष्ट्रीय सेवा योजनेचे सक्रिय सदस्य होते. त्यामुळे एनएसएसच्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे. जीवनातील मूल्यांची जपणूक करत शेतकऱ्यांप्रती आस्था व आत्मीयता वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या अडचणी तळागाळापर्यंत जाऊन समजून घेतल्यास त्यावर प्रभावी उपाययोजना करता येतात, असेही त्यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंदानकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने व जबाबदारीने सहभाग घ्यावा. या शिबिरातून जीवनातील नवनवीन मूल्ये आत्मसात करावीत. येथे मिळणारे अनुभव व शिकवण पुढील व्यावहारिक आयुष्यात निश्चितच उपयुक्त ठरतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चगदळे व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी शिबिराच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. संतोष टेकाळे, दिलीप चेके, गणेश हांडे, दत्ता जाधव, महेंद्र जाधव, पांडुरंग सोनुने, गजानन शेळके, हिम्मत जाधव, भास्कर जाधव, राहुल खंडागळे तसेच प्रा. विकास म्हस्के, प्रा. वैभव देशमुख, सय्यद असिम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष निवासी शिबिराच्या माध्यमातून पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कृषी-पशुसंवर्धन, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक मार्गदर्शन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्यासाठी प्रेरित करत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती मोरे व अंकिता काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरी सोळंकी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व उत्तम नियोजनासह पार पडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top