LCB nabbed : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर टिप्पर घालून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या २३ वर्षीय आरोपीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. हर्षल मनोहर अंभोरे (वय २३, रा. एकलारा, ता. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले आहे.

तलाठी-पटवारींच्या आंदोलनाला यश; छत्रपती संभाजी नगर येथून शिताफीने केली अटक
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल पथकावर टिप्पर घालून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या २३ वर्षीय आरोपीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले. हर्षल मनोहर अंभोरे (वय २३, रा. एकलारा, ता. चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी अंढेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील तहसीलदार दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजता अंढेरा फाटा येथे अधिनस्त शासकीय कर्मचारी व साक्षीदारांसह अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात कारवाई करीत होते. यावेळी एक पांढऱ्या रंगाचा टिप्पर विनापरवाना सुमारे चार ब्रास रेती वाहतूक करताना आढळून आला.
महसूल पथकाकडून टिप्परवर कारवाई सुरू असताना आरोपी हर्षल अंभोरे घटनास्थळी आला. त्याने पकडलेल्या टिप्परच्या चालकाला वाहन घेऊन जाण्यास सांगितले. तसेच, कोणी मध्ये आले तर वाहन उडवून टाक आणि त्यानंतर काय करायचे ते आपण पाहू, अशा आशयाची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, टिप्पर चालक वाहन घेऊन पळून जाऊ लागल्याने महसूल पथकाने त्याचा पाठलाग केला. यावेळी टिप्पर चालकाने वाहन फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाहनाच्या उजव्या बाजूला धडकावल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर आरोपी हर्षल अंभोरे याने त्याचे वाहन महसूल पथकाच्या वाहनासमोर आडवे लावून टिप्पर पळून जाण्यास मदत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), १३२, ३०३(२), १२६(२), ४५, ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. महसूल पथकावरील या हल्ल्याचा निषेध करत जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)/पटवारी संघटना तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी कामबंद आंदोलन केले होते. फरार आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी फरार आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत होते. सातत्यपूर्ण तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हर्षल अंभोरे हा छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले.
या माहितीच्या आधारे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे सापळा रचून आरोपी हर्षल अंभोरे याला मोठ्या शिताफीने पकडले. त्यानंतर त्याला अंढेरा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश घुगे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक, खामगाव पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरदचंद्र गिरी, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, पुरुषोत्तम आघाव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल अंभोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा जाधव, चालक पोलीस कॉन्स्टेबल विलास भोसले यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, पवन मखमले, पोलीस कॉन्स्टेबल ऋषीकेश खंडेराव, कैलास ठोंबरे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांचा समावेश होता.
महसूल पथकावरील हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला अटक झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात असल्याचा संदेश गेला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

