Sakharkherda area run dry :साखरखेर्डा परिसरातील सावंगी माळी एक व दोन प्रकल्पांसह अनेक लघू आणि मध्यम तलावांनी तळ गाठल्याने परिसरातील पाणीस्थिती गंभीर बनली आहे. बहुसंख्य तलाव कोरडे पडले असून मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आगामी काळात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृतसाठ्यावर तलाव, धोक्यात पाणीपुरवठा; अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची चिन्हे
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरातील सावंगी माळी एक व दोन प्रकल्पांसह अनेक लघू आणि मध्यम तलावांनी तळ गाठल्याने परिसरातील पाणीस्थिती गंभीर बनली आहे. बहुसंख्य तलाव कोरडे पडले असून मुक्या जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. आगामी काळात अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परिसरातील महालक्ष्मी, गायखेडी, राजेगाव आणि सावंगी माळी या प्रमुख तलावांतील जलसाठा अत्यल्प पातळीवर पोहोचला आहे. काही तलावांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक असून अनेक तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साखरखेर्डा गावाला महालक्ष्मी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तलावातील साठा कमी होत असल्याचे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कोराडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना सुरू केल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र महालक्ष्मी तलावावर अवलंबून असलेल्या सावंगी भगत गावात पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गाव भीषण टंचाईच्या उंबरठ्यावर उभे आहे.
गायखेडी तलावातून राताळी आणि शिंदी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु तलावातील पाणीपुरवठा विहिरींची पातळी खालावल्याने दोन्ही गावांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सावंगी माळी एक आणि दोन हे परिसरातील महत्त्वाचे तलाव मे महिन्यातच कोरडे पडले आहेत. या तलावांवर उमनगाव, पांग्रीकाटे, वडगाव माळी, सावंगी माळी आणि सावंगी वीर या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तलावातील विहिरींनी तळ गाठल्याने या गावांनाही पिण्याच्या पाण्याचे संकट भेडसावण्याची शक्यता आहे.
राजेगाव तलावात केवळ मृतसाठा शिल्लक असून शेंदुर्जन, राजेगाव, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, गोरेगाव आणि जागदरी या गावांच्या पाणीपुरवठा योजना या तलावावर अवलंबून आहेत. जलसाठा अपुरा असल्याने या गावांनाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, परिसरातील लहान पाझर तलाव यापूर्वीच कोरडे पडले आहेत. त्यामुळे उर्वरित तलावांमधील उपलब्ध पाणी राखीव ठेवून त्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आगामी काही आठवड्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

