Kharif crops: यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात न घेता तालुकानिहाय नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी. तसेच देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत द्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठी ओढ दिल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात न घेता तालुकानिहाय नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी. तसेच देऊळगाव राजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक भागांत अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली असून पाण्याअभावी कापूस, सोयाबीन, मूग आणि उडीद ही पिके करपू लागली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांची अवस्था बिकट झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे आहेत.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. पंचनाम्याच्या आधारे नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करून तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सवलती व मदतीचा लाभ तातडीने द्यावा. नुकसानग्रस्त पिकांसाठी आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई, तसेच पीकविमा नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांची परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करून त्यांना शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष राजेश इंगळे, तालुका अध्यक्ष मन्नान पठाण, नारायण कोल्हे, शौकत हुसेन, नगरसेवक ॲड. रामेश्वर रामाने, भुजंग चेके, संजय दहातोंडे, शिवाजी कोल्हे, विलास खराट, रमेश सोसे, भिकाजी निलख, संतोष शेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

