Mahabreaking

[breaking_news]

Lalitotsav:  हजारो भाविकांच्या साक्षीने श्री बालाजी महाराजांचा लळितोत्सव उत्साहात संपन्न!

Lalitotsav: प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जागृत देवस्थानाचा लौकिक असलेल्या श्री बालाजी महाराजांचा ३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला लळितोत्सव गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्थीला पहाटे ५.४५ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Lalitotsav

  २१ महाकाय लाटा एकाच वेळी मंदिराच्या दिशेने कलंडल्या; ३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपणारा लळितोत्सव

गजानन तिडके

देऊळगाव राजा : प्रतितिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जागृत देवस्थानाचा लौकिक असलेल्या श्री बालाजी महाराजांचा ३३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला लळितोत्सव गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी आश्विन कृष्ण चतुर्थीला पहाटे ५.४५ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्री बालाजी महाराजांच्या मंदिरासमोर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला २१ महाकाय लाकडी लाटा आणि ४२ मंडप दोरांच्या साहाय्याने उभारून मंडपोत्सव साजरा करण्यात आला होता. हा मंडपोत्सव सलग दहा दिवस सुरू होता. लाटा आणि मंडपांखालून जाण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देशात अन्यत्र पाहायला न मिळणारा लळिताचा हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी पूर्वसंध्येपासूनच भाविकांची मोठी मांदियाळी जमली होती.

पहाटे काकड आरतीने उत्सवाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिरावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी ब्रह्मवृंदांच्या वतीने शांतिपाठ करण्यात आला, तर काल्याचे कीर्तनही पार पडले. श्री बालाजी महाराजांची आरती सुरू झाल्यानंतर आणि दहीहंडी फुटताच एकाच वेळी सर्व २१ लाटा मंदिराच्या दिशेने कलंडल्या. हा थरारक आणि नेत्रदीपक क्षण पाहून उपस्थित भाविकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि श्रींच्या जयघोषात आनंद व्यक्त केला. त्यानंतर श्रींच्या मूर्तीची विधिवत गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली.

लाडू प्रसाद वितरणाला भाविकांचा प्रतिसाद

लळितोत्सवानंतर श्री बालाजी संस्थानच्या वतीने भाविकांना लाडू प्रसादाचे वितरण करण्यात आले. लाडू प्रसाद तयार करणे आणि त्याचे वितरण करण्यासाठी मारवाडी समाजाने विशेष परिश्रम घेतले. ज्या भाविकांना अतिरिक्त प्रसाद हवा होता, त्यांच्यासाठी प्रतिलाडू १० रुपये या दराने प्रसाद उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमाला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सामाजिक संघटनांकडून भाविकांची सेवा

लळितोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पूर्वसंध्येलाच देऊळगाव राजा शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना आणि मित्रमंडळांच्या वतीने चहा, नाश्ता तसेच इतर आवश्यक सेवांची व्यवस्था करण्यात आली होती. श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी विविध सेवा स्टॉलना भेटी दिल्या. यावेळी श्री बालाजी संस्थानच्या वतीने सेवा देणाऱ्या मंडळांचा सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या सेवाभावी उपक्रमांतर्गत परिसरातील महिला स्वयंसेविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत अन्नछत्र सेवा, मंदिर परिसराची स्वच्छता, भाविकांच्या दर्शनरांगांचे नियोजन आणि लाडू प्रसाद वितरण अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. संपूर्ण आठवडाभर सेवा देत या महिलांनी सेवाभावाचा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाचे नियोजन राणीसाहेब सौ. छायाराजे विजयसिंह जाधव दरवर्षी करतात.

शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी सामूहिक प्रयत्न

लळितोत्सव शांततामय वातावरणात पार पडावा, यासाठी श्री बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, व्यवस्थापक किशोर बीडकर, संस्थानचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, सर्व मानकरी, सेवेकरी आणि नागरिकांनी परिश्रम घेतले. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, धार्मिक परंपरेचे जतन आणि विविध सेवाभावी उपक्रमांमुळे यंदाचा लळितोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top