uncle brutally murdered : घरगुती वादातून काकानेच पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हातणी येथे दि. २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडली. समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत मक्याच्या शेतात लपलेल्या आरोपीला अटक केली.

चिखली पोलिसांनी दोन तासांतच केली आरोपीला अटक
चिखली: घरगुती वादातून काकानेच पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील हातणी येथे दि. २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री घडली. समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत मक्याच्या शेतात लपलेल्या आरोपीला अटक केली.
गोपाल अजाबराव जाधव (वय अंदाजे २४, रा. हातणी) असे मृतकाचे नाव असून विनोद रामचंद्र जाधव (रा. हातणी) असे आरोपी काकाचे नाव आहे. आरोपी विनोद व त्याची पत्नी मिरा यांच्यात सायंकाळी वाद झाला होता. त्या वेळी गोपालने, “तुमच्या नेहमीच्या भांडणामुळे समाजात बदनामी होत आहे. वाद करायचे असतील तर या घरात राहू नका,” असे म्हटल्याने आरोपीने राग मनात धरल्याचे सांगण्यात येते.
रात्री गोपाल हा घरातील लोखंडी पलंगावर झोपलेला असताना आरोपी विनोदने लोखंडी कुऱ्हाडीने वार करून त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गोपालचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी काका घटनास्थळावरून पसार झाला होता.
या प्रकरणी मृतकाचे आजोबा रामचंद्र मारोती जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत मक्याच्या शेतातून दोन तासांत अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. शरद भागवतकर करीत असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे हातणी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

