Old Pension Scheme: राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनी, दि. ५ सप्टेंबर रोजी अकोला येथे काळ्या फिती लावून मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त २६ हजार कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शनची मागणी
बोरगाव मंजू : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे २६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनी, दि. ५ सप्टेंबर रोजी अकोला येथे काळ्या फिती लावून मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर येथील अधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आश्वासन दिल्याचा संघटनेचा दावा आहे. त्यानंतर मुंबई येथील पावसाळी अधिवेशनादरम्यान शासन सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सहकार्य करेल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
मात्र, अद्याप १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तसेच अकोला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी तसेच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
शिक्षण संघर्ष संघटना, महाराष्ट्र राज्य व जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पेन्शनप्राप्तीच्या मागणीसाठी लढणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अकोला येथील अशोक वाटिका येथे उपस्थित राहावे, असे आवाहन अकोला जिल्हा शिक्षण संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

