Husband sentenced :पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी पती आशिष वसंतराव नागे (रा. पैलपाडा, ता. जि. अकोला) याला सात वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सक्तमजुरीची शिक्षा ; वैवाहिक छळप्रकरणी आरोपी पती दोषी
अकोला : पत्नीचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी पती आशिष वसंतराव नागे (रा. पैलपाडा, ता. जि. अकोला) याला सात वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातवळेकर यांनी सत्र खटला क्रमांक ६४/२०२३ मध्ये हा निकाल दिला. पोलीस स्टेशन उरळ येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २१९/२०२२ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ), ३०४ (ब), ३०६, ५०४ व ३४ अन्वये हा खटला चालविण्यात आला होता.
न्यायालयाने आरोपी आशिष नागे याला कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत दोषी ठरवत ७ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड, तर कलम ४९८ (अ) (वैवाहिक छळ) अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत. या प्रकरणात फिर्यादी नंदा रामदास साबळे (वय ४४, रा. मांजरी, ता. बाळापूर) यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर गोमासे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
खटल्यादरम्यान साक्षीदारांनी भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. न्यायालयीन कामकाजात उरळ पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साक्षीदारांचे समन्वय व पाठपुरावा प्रभावीपणे केल्याने दोषारोप सिद्ध होण्यास मदत झाली.
दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपी शोभा नागे, नितीन नागे, जयश्री सरकटे आणि शारदा जामणीक यांना न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. शाम खोटरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच सीएमएस सेलचे कर्मचारी अन्वर खान, उकंडा जाधव आणि उरळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी मतने यांनी खटल्याच्या पाठपुराव्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या प्रकरणात पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेडडी आणि उरळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पोलिसांनी सांगितले.

