Husband kills : खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत करत धडाकेबाज कारवाईचे उदाहरण घालून दिले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि वेगवान तपास याच्या जोरावर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.

एमआयडीसीतील शेतात दगडाने ठेचून हत्या; तांत्रिक तपासाच्या जोरावर आरोपी जेरबंद
मेहकर : खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत करत धडाकेबाज कारवाईचे उदाहरण घालून दिले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि वेगवान तपास याच्या जोरावर संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांना अटक
४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता एमआयडीसी परिसरातील शेतात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीतच हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाची सूत्रे वेगाने हलू लागली.
मृताची ओळख राहुल भानुदास बाजड (वय २८, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) अशी पटली. घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. तपासासाठी चार स्वतंत्र पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाला मार्गदर्शन केले.
तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथून ओम शामराव केनवडकर (वय ३६) याला त्याच्या शेतातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत राहुल हा आरोपीच्या पत्नीस काही दिवसांपासून त्रास देत होता. वारंवार समज देऊनही तो न ऐकल्याने ३ मार्च रोजी त्याला खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात नेऊन दगडाने मारहाण करून खून केल्याची माहिती आरोपीने दिली.
या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ (वय ४०, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, अशोक अवचार, उपनििरीक्षक गणेश कड, कांचन जारवाल तसेच मेहकर व सायबर पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केल्याने मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.

