Mahabreaking

[breaking_news]

Bharat Mata Temple :नंदापूर येथे साकारतेय भव्य श्री भारत माता मंदिर; २८ सप्टेंबरला लोकार्पण सोहळा

Bharat Mata Temple : प.पू. सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या ‘राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेतून नंदापूर येथे समृद्धी महामार्गालगत साकारण्यात येत असलेल्या भव्य श्री भारत माता मंदिराच्या वास्तूचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात भारतमातेच्या भव्य मूर्तीची स्थापना व लोकार्पण करण्यात येणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.

Bharat Mata

  ‘राष्ट्रभक्ती हीच ईश्वरभक्ती’; भारत माता मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : प.पू. सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या ‘राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेतून नंदापूर येथे समृद्धी महामार्गालगत साकारण्यात येत असलेल्या भव्य श्री भारत माता मंदिराच्या वास्तूचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या टप्प्यात भारतमातेच्या भव्य मूर्तीची स्थापना व लोकार्पण करण्यात येणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.

श्री भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी उद्योजक व समाजसेवक घनश्याम शेठ गोयल राहणार आहेत.

१०० फुटांपेक्षा अधिक उंचीची भव्य वास्तू

श्री भारत माता मंदिराच्या वास्तूची एकूण उंची १०० फुटांपेक्षा अधिक असणार आहे. मंदिर परिसरात सुमारे चार हजार चौरस फुटांचा भव्य सभागृह उभारण्यात येत असून, त्यामध्ये पाच फूट उंचीची भारतमातेची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येत आहे. या मूर्तीची स्थापना व लोकार्पण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा देणारे चित्र प्रदर्शन व ग्रंथालय

मंदिरातील भव्य सभागृहात भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील विविध घटनांचे चित्र प्रदर्शन तसेच ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भावी पिढीला देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची, क्रांतिकारकांची आणि हुतात्म्यांच्या त्यागाची ओळख व्हावी, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे.

मंदिराच्या वास्तूच्या बांधकामात भारतीय संस्कृती आणि स्थापत्यकलेचे विविध पैलू साकारण्यात येणार आहेत. लाल किल्ल्याची प्रतिकृती, कोणार्क मंदिराचे चक्र, अजिंठा लेणीची कमान तसेच दक्षिण आणि उत्तर भारतीय स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये या वास्तूमध्ये पाहायला मिळणार आहेत.

राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा संकल्प

राष्ट्रमाता, गोमाता आणि गंगामाता यांना भारतीय संस्कृतीत मातृत्वाचा मान दिला आहे. समता आणि समरसतेच्या संस्कारांचे अधिष्ठान असलेल्या भारतमातेच्या वैभवाचे दर्शन या प्रकल्पाच्या माध्यमातून घडावे, अशी या मंदिरामागील संकल्पना आहे.

स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या चरणी समर्पित करणाऱ्या क्रांतिकारी हुतात्म्यांची ओळख तरुण पिढीला व्हावी आणि त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी, या भावनेतून भारत माता मंदिर प्रकल्पाची निर्मिती होत आहे.

‘राष्ट्रभक्ती हीच ईश्वरभक्ती’ हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजावा आणि भारतमातेच्या चरणी सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या राष्ट्रकार्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने सहभागी व्हावे तसेच हे ईश्वरी कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन भारत माता मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top