Golegaon leads : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास उपक्रमांत देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामपंचायतने या अभियानातील तब्बल ९५ टक्के कामे पंधरवड्यात पूर्ण करून इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श निर्माण केला आहे.

देऊळगाव राजा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विविध विकास उपक्रमांत देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामपंचायतने या अभियानातील तब्बल ९५ टक्के कामे पंधरवड्यात पूर्ण करून इतर ग्रामपंचायतींसमोर आदर्श निर्माण केला आहे.
या अभियानाअंतर्गत गावचे सरपंच दत्ताभाऊ कोल्हे यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली लोकसहभागातून विविध विकासकामे राबविण्यात आली. यामध्ये वृक्षलागवड, सूक्ष्म सिंचन योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, गावातील भिंतींवर शासनाच्या विविध योजनांचे संदेश देणाऱ्या रंगरंगोटी (बोलक्या भिंती), रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग तसेच ठिकठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले.
गावातील अडगळीत पडलेले शेतरस्ते खुले करण्यात आले. तसेच घरकुल योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरांमध्ये लाभार्थ्यांना गृहप्रवेश देण्यात आला. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय व इतर शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता व रंगरंगोटी करून जनजागृती करण्यात आली.
आरोग्य, रोजगार व डिजिटल सेवा
सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी विविध ग्रामउद्योग प्रशिक्षण, आयुष्मान भारत कार्ड कॅम्प, आरोग्य शिबिरे घेण्यात आली. दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयामार्फत ग्रामस्थांना ऑनलाईन दाखले व विविध शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली.
संयुक्त प्रयत्नातून यश
या संपूर्ण अभियानाचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी केले. यामध्ये उपसरपंच श्रीराम बर्डे, ग्रामविकास अधिकारी सौ. शारदा नवले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्ता कोल्हे, पोलीस पाटील विठ्ठल कोल्हे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ. अनुसया कोल्हे, महेश वालोकार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय खारडे, शिक्षक समाधान घुगे, विठ्ठल तांदळे, प्रवीण सोनवणे, वशिष्ठ शिंदे, लक्ष्मण बंगाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

