Gambling : बीबी येथे सुरू असलेल्या संतोषी माता यात्रा महोत्सवात जुगार खेळण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असून, पोलिसांनी दोन दिवसांत दोन जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे. यात्रेच्या गर्दीचा गैरफायदा घेत खुलेआम जुगार सुरू असल्याचे चित्र आहे.

रमेश खंडागळे
बीबी : बीबी येथे सुरू असलेल्या संतोषी माता यात्रा महोत्सवात जुगार खेळण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असून, पोलिसांनी दोन दिवसांत दोन जुगाऱ्यांवर कारवाई केली आहे. यात्रेच्या गर्दीचा गैरफायदा घेत खुलेआम जुगार सुरू असल्याचे चित्र आहे.
दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.४० ते ६.०० वाजेदरम्यान संतोष उर्फ संदीप नामदेव हिवाळे (रा. बीबी) हा यात्रास्थळी जुगार खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांसह आढळून आला. पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५५० रुपये नगद, तितली-भवरा जुगारासाठी वापरण्यात येणारे दोन लॅपटॉप कीपॅड, दोन छोटे स्पीकर (किंमत ४०० रुपये), हार्डडिस्क (किंमत ५०० रुपये), कनेक्टर केबल व वायर (किंमत ३०० रुपये) असा एकूण १,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याआधी दि. १६ जानेवारी २०२६ रोजीही अशाच प्रकारची घटना घडली होती. सायंकाळी ४.०० ते ४.३० वाजेदरम्यान सलीम सुभान परसुवाले (रा. हिवराखंड) हा यात्रेत जुगार खेळताना आढळून आला. त्याच्याकडून ३५० रुपये नगद, तितली-भवरा जुगाराचे साहित्य व आकडे लिहिलेली चिठ्ठी जप्त करण्यात आली. या प्रकरणातही बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिनेश चव्हाण यांनी फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यात्रेच्या ठिकाणी एक-दोन दिवसांपासून जुगारासाठी मंडप टाकून खुलेआम जुगार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या जुगाराला परवानगी कोणी दिली? असा सवाल उपस्थित होत असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

