Samadhan Salokar : पातूर पंचायत समिती अंतर्गत सावरगाव येथे कार्यरत असलेले सचिव समाधान साळोकार यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतेच निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामसेवक समाधान साळोकार हे सावरगाव येथील महिला सरपंचांना विचारात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा तसेच महिला सरपंच व नागरिकांशी असभ्य वर्तन करून अपमानित करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे न करणे व कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचेही आरोप होते.

महिला सरपंच व ग्रामस्थांशी असभ्य वर्तन भोवले
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर पंचायत समिती अंतर्गत सावरगाव येथे कार्यरत असलेले सचिव समाधान साळोकार यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतेच निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामसेवक समाधान साळोकार हे सावरगाव येथील महिला सरपंचांना विचारात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा तसेच महिला सरपंच व नागरिकांशी असभ्य वर्तन करून अपमानित करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार कामे न करणे व कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचेही आरोप होते.
जिल्हा परिषद अकोला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशीअंती त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश नायसे यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी केली. तसेच त्यांच्या ताब्यातील सावरगाव व खेट्री ग्रामपंचायतींचा प्रभार काढून घेण्यात आला.
सावरगाव ग्रामपंचायतीचा तात्पुरता प्रभार एस. बी. चवरे यांच्याकडे देण्यात आला असून समाधान साळोकार यांना तेल्हारा येथे मुख्यालयी पाठवण्यात आले आहे. तसेच खेट्री ग्रामपंचायतीचा प्रभार काढून तो तात्पुरता डी. एस. वाहोकार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सावरगाव येथील ग्रामसेवक समाधान साळोकार यांना निलंबित करण्याबाबत अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. साळोकार यांच्यावर तीन ते चार आरोप ठेवण्यात आले होते. त्याआधारे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश नायसे यांनी दिली.
अकोला जिल्ह्यातील ही बातमी वाचा : विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ; चान्नी ठाणे हद्दीतील गावातील घटना

