Mahabreaking

[breaking_news]

Kharif Planning :खरिपाच्या नियोजन खर्चाची बळीराजाला धास्ती..! पेरणीपूर्व मशागतीला वेग; बियाणे खरेदीस लगबग

Kharif Planning : मृग नक्षत्रात वरुणराजाचे आगमन होईल, या आशेने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी जोरदार तयारीला लागला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, हंगामाच्या नियोजनाच्या चिंतेने शेतकऱ्यांनी वाढत्या खर्चाची धास्ती घेतली आहे.

Kharif Planning

गजानन तिडके

 देऊळगाव राजा : मृग नक्षत्रात वरुणराजाचे आगमन होईल, या आशेने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. तालुक्यातील शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी जोरदार तयारीला लागला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, हंगामाच्या नियोजनाच्या चिंतेने शेतकऱ्यांनी वाढत्या खर्चाची धास्ती घेतली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या हंगामात बियाणे, खते व औषधांच्या दरवाढीची झळ शेतकऱ्यांना बसली होती. या हंगामातही खर्चवाढीचे संकेत असल्याने उत्पन्नवाढीऐवजी मजुरीसह वाढत्या खर्चाचीच चिंता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. गत महिन्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेला कांदा, उन्हाळी भुईमूग व इतर उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीतून उरलेला माल विक्रीसाठी नेल्यानंतर मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

नफ्याची खात्री नाही; घोषणांचा अंमल वेळेवर नाही

तालुक्यातील विविध महसूल मंडळांमध्ये काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये कांदा, उन्हाळी भुईमूग तसेच काढणीस आलेल्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरींवर बसविण्यात आलेल्या सौर पॅनेल्सचेही नुकसान झाले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेतली आहेत. ज्यांची मशागत पूर्ण झाली आहे, त्या शेतकऱ्यांनी लागवड तसेच पेरणीसही सुरुवात केली आहे.

खते, बी-बियाणे, मजुरी आणि शेतीचा एकूण खर्च पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पीक घरात येईपर्यंतच नव्हे, तर बाजारात विक्री होईपर्यंतही नफा मिळेल याची खात्री राहिलेली नाही. सरकारी घोषणांची अंमलबजावणीही अनेकदा धिम्या गतीने होत असल्याने कालावधी निघून गेल्यानंतर मिळणाऱ्या मदतीला फारसा अर्थ राहत नाही. शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या ज्वलंत प्रश्नाकडे ना प्रशासकीय अधिकारी, ना लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत असल्याचे चित्र आहे. आधीचे कर्ज, उधारी व उसनवारी बाकी असतानाच नवीन हंगाम तोंडावर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे दिसून येत आहे.

“नैसर्गिक आपत्तीसमोर शेतात काढून ठेवलेला कांदा टिकला नाही. राहिलेल्या कांद्यालाही भाव नाही. रब्बी हंगामात गहू व कांद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांच्या नुकसानीकडेही शासनाने दुर्लक्ष केले. आता खरिपाच्या नियोजनावेळी शेतकऱ्यांचे लक्ष कपाशीकडे लागले आहे. यंदा निसर्गाने साथ दिली, तर केलेला खर्च निघून काही उत्पन्न पदरात पडेल.”

माधवराव तिडके (शेतकरी)

 

“कांदा साठवून ठेवला; पण योग्य भाव मिळेल की नाही, याची खात्री नाही. सध्या शेतकरी खरीप हंगामात कपाशीची लागवड करावी की सोयाबीनची पेरणी करावी, याबाबत चर्चा करत आहेत. यावर्षी कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा भुसाऱ्यात तसेच कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. मात्र योग्य भाव कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे साठवून ठेवलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळेल की नाही, याची कोणतीही हमी नाही.”

राजू डोंगरे (शेतकरी)

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top