Farmer saves life of Nilgai Padas : बोरगाव मंजू नजीकच्या अन्वी–मिर्झापूर शेत शिवारात श्वानांच्या हल्ल्यात सापडलेल्या निलगाय पाडसाचे प्राण एका जागरूक शेतकऱ्याने धाडसाने वाचविल्याची स्तुत्य घटना घडली आहे. रब्बी हंगामातील गहू पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे या वन्यजीवाला नवे जीवन मिळाले.

अन्वी–मिर्झापूर शिवारातील थरार; वनविभागाच्या तत्काळ उपचाराने पाडस बचावले
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू नजीकच्या अन्वी–मिर्झापूर शेत शिवारात श्वानांच्या हल्ल्यात सापडलेल्या निलगाय पाडसाचे प्राण एका जागरूक शेतकऱ्याने धाडसाने वाचविल्याची स्तुत्य घटना घडली आहे. रब्बी हंगामातील गहू पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे या वन्यजीवाला नवे जीवन मिळाले.
घटनेच्या वेळी शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना दोन निलगायची पाडसे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत असल्याचे दिसून आले. त्यांच्या पाठलागावर चार ते पाच श्वान शिकार करण्याच्या उद्देशाने लागले होते. यामध्ये एक पाडस पळून जाण्यात यशस्वी झाले; मात्र दुसरे पाडस श्वानांच्या तावडीत सापडले.
हा प्रकार लक्षात येताच शेतकरी अहमद पटेल यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत श्वानांना हुसकावून निलगाय पाडसाला त्यांच्या कचाट्यातून सोडविले. श्वानांच्या हल्ल्यात पाडस जखमी झाल्याचे लक्षात येताच, तातडीने उपचारासाठी सर्पमित्र तथा वन्यजीव मित्र प्रशांत नागे यांना घटनेची माहिती देण्यात आली.
प्रशांत नागे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गजानन गायकवाड, डी. एम. गडलिंगे, आशिष वंझारी व रज्जाक पटेल यांनी घटनास्थळी दाखल होत निलगाय पाडसाला ताब्यात घेत उपचार केले. वेळेवर उपचार मिळाल्याने पाडसाचे प्राण वाचले.
या घटनेमुळे शेतकरी अहमद पटेल यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

