Electricity theft : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून अकोला परिमंडळात राबविण्यात येत असलेल्या धडक तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिलपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील तब्बल १ हजार ६१२ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, एकट्या ऑगस्ट महिन्यात ४३६ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत.

हुक टाकून, मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी; महावितरणच्या धडक मोहिमेत बुलढाणा आघाडीवर
बुलढाणा : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणकडून अकोला परिमंडळात राबविण्यात येत असलेल्या धडक तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिलपासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील तब्बल १ हजार ६१२ ठिकाणी वीजचोरी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, एकट्या ऑगस्ट महिन्यात ४३६ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
थेट वीजवाहिनीवर हुक टाकून तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरल्याच्या १ हजार ४७५ प्रकरणांमध्ये २ कोटी ६५ लाख रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली आहे. उर्वरित १३७ प्रकरणांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे.
बुलढाण्यात सर्वाधिक वीजचोऱ्या
धडक तपासणी मोहिमेत अकोला जिल्ह्यात ३४६ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून, त्यापैकी ३२८ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या प्रकरणांत ७३ लाख रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली असून, उर्वरित १८ प्रकरणांचे मूल्यांकन सुरू आहे.
वाशिम जिल्ह्यात ३३२ वीजचोऱ्या उघडकीस आल्या असून, त्यापैकी २८१ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या प्रकरणांत ४३ लाख रुपयांची वीजचोरी निश्चित करण्यात आली आहे. अकोला परिमंडळात सर्वाधिक ९३४ वीजचोऱ्या बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. त्यापैकी ८६६ प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, १ कोटी ४७ लाख रुपयांची वीजचोरी निष्पन्न झाली आहे.
८८१ ग्राहकांकडून १ कोटी ७७ लाखांचा भरणा
आतापर्यंत निष्पन्न झालेल्या २ कोटी ६५ लाख रुपयांच्या वीजचोरीच्या बिलांपैकी ८८१ ग्राहकांनी १ कोटी ७७ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील २२६ ग्राहकांनी ५९ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील १५२ ग्राहकांनी २७ लाख रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील ५०३ ग्राहकांनी ९१ लाख रुपये जमा केले आहेत.
पाच ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल
वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये नियमानुसार दंडात्मक तडजोड शुल्क आकारण्यात येत आहे. दंड व तडजोड शुल्काचा भरणा न करणाऱ्या परिमंडळातील पाच ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा, २००३ मधील कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील तीन आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन ग्राहकांचा समावेश आहे. वीजचोरीची रक्कम दंडासह विहित मुदतीत न भरणाऱ्यांवर कलम १३५नुसार थेट फौजदारी कारवाई केली जात आहे. या कलमानुसार तीन वर्षांपर्यंतच्या कारावासासह दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
थकबाकीदारांवरही विशेष नजर
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही विशेष तपासणी करण्यात येत आहे. थकबाकीदारांनी अन्य ठिकाणाहून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जात आहे. वितरणातील व वाणिज्यिक हानी कमी करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही विशेष मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार आहे. वीजचोरी हा कायद्याने गंभीर गुन्हा असून, त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी केवळ अधिकृत वीज जोडणीद्वारेच वीज वापरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

