Elections postponed : न्यायालयीन प्रक्रियेमुळे देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनपेक्षित बदलामुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे उमेदवार बेचैन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गल्लीबोळातील प्रचारक ‘थंड बस्त्यात’… अतिरिक्त खर्चामुळे उमेदवार बेचैन
गजानन तिडके
देऊळगाव राजा : न्यायालयीन प्रक्रियेमुळे देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या अनपेक्षित बदलामुळे होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे उमेदवार बेचैन झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ना भूतो ना भविष्यति – निवडणुकीत अचानक उलथापालथ
निवडणुकीचे सर्व गणित मांडून उमेदवार अंतिम तयारी करत असतानाच मतदान आदल्या दिवशीच तारीख बदलण्याचा आदेश आला. मतदारांवर याचा फारसा परिणाम नसला तरी उमेदवार मात्र चिंतेत आहेत. आतापर्यंत झालेला खर्च आणि पुढील काही दिवसांत होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे ते द्विधा मनःस्थितीत असल्याचे दिसत आहे. निवडणूक विभागाकडून अतिरिक्त खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना अद्याप आलेल्या नाहीत.
नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत?
देऊळगाव राजा नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात तीन उमेदवार आहेत. तिरंगी लढत होणार की एकतर्फी निकाल लागू शकतो, हे येणारे दिवस ठरवतील. माधुरी सिपणे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप व मित्रपक्ष समर्थन, नेहा सुनगत – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्ष ,शोभाताई कासारे – शिवसेना (उबाठा गट), काँग्रेस व मित्रपक्ष असे उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी ‘अनैसर्गिक युती’बाबत उमेदवारांना प्रश्न विचारत त्यांना कोंडीत पकडल्याचे दृश्य सध्या दिसत आहे. स्थानिक पातळीवरील प्रतिष्ठेच्या या लढतीत अशा युतींमुळे खरंच जनतेचे भले होणार की फक्त राजकीय स्वार्थ साधला जात आहे, याचा निर्णय येणारा काळ घेणार आहे.
युवा पिढीने सतर्क राहणे – काळाची गरज
प्रचारामध्ये नेहमीप्रमाणे युवा वर्गाचा मोठा सहभाग असतो. पण काही उमेदवार आर्थिक प्रलोभने, मोफत भोजन, गिफ्ट, तसेच मद्यवाटप यासारख्या चुकीच्या पद्धतींचा अवलंब करत असल्याचे दिसते.
एका मतासाठी तरुण पिढीचे भविष्य खराब केले जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक मोठ्या प्रमाणावर या प्रक्रियेत गुंतत असल्याने त्यांच्या अभ्यासावर व भविष्यातील कारकिर्दीवर परिणाम होताना दिसतो. या पिढीला व्यसनाधीनतेपासून वाईट सवयींपासून वाचवणे ही उमेदवारांची नैतिक जबाबदारी आहे.
स्टार प्रचारकांच्या सभा पुन्हा रंगणार का?
येथील निवडणूक आजी–माजी लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठेची केली असल्याने ‘स्टार प्रचारक’ पुन्हा सभा घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा यापूर्वी येथे पार पडली होती. तिन्ही उमेदवारांच्या समर्थनार्थ विविध मोठ्या नेत्यांच्या सभा व रॅलीही झाल्या. पुढे ढकललेल्या निवडणुकीमुळे या सभांची पुनरावृत्ती संभवते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, प्रभागातील उमेदवारांनी नेमलेल्या प्रचारकांचा खर्च भागवताना उमेदवारांच्या नाकी नऊ येत असल्याचे वास्तवही लपलेले नाही.

