Dhad police crack : वाहनातून दोन लाख रुपये असलेली बॅग चोरून नेणाऱ्या टोळीचा धाड पोलिसांनी यशस्वी तपास करून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह मोटारसायकल आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन प्रौढ आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

गाडीतून दोन लाखांची रोकड लंपास करणारी टोळी जेरबंद; धाड पोलिसांची धडक कारवाई
पंडीत सावळे
मासरुळ : वाहनातून दोन लाख रुपये असलेली बॅग चोरून नेणाऱ्या टोळीचा धाड पोलिसांनी यशस्वी तपास करून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह मोटारसायकल आणि चार मोबाईल असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन प्रौढ आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. ४३३/२०२६, कलम ३०२(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये नोंद असलेल्या गुन्ह्यात फिर्यादीची दोन लाख रुपये रोख असलेली बॅग आरोपींनी वाहनातून चोरून नेली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) आणि अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैलानी येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली दोन लाख रुपयांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
या कारवाईत रामू वेंगा दुसन तोटीनायकर (वय ३८, रा. तिरुचिरापल्ली, तामिळनाडू), कमासा मारमुत्तू तोटीनायकर (वय ३६, रा. वाकीपाडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. आरोपींकडून दोन लाख रुपये रोख, ४५ हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल आणि ३० हजार ५०० रुपये किमतीचे चार मोबाईल असा एकूण २ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान जप्त केलेली मोटारसायकल जाफ्राबाद पोलीस ठाणे, जिल्हा जालना येथे दाखल असलेल्या अप.क्र. ३७७/२०२६, कलम ३०३(२) BNS या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे धाड येथील बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यासोबतच जाफ्राबाद येथील मोटारसायकल चोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक (API) सुनील इंगळे, पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे, चांद शेख, अनुप मेहर, पोलीस कॉन्स्टेबल सतीश नाटेकर आणि वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती पुंड यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात धाड पोलिसांना यश आले असून, आंतरजिल्हा गुन्हेगारीचे धागेदोरेही समोर आले आहेत.

