Buddha-bhumi Shirla: विवाह जुळविताना होणारा अनावश्यक खर्च, आर्थिक ओढाताण आणि पालकांवरील वाढता आर्थिक भार कमी करण्याच्या सामाजिक उद्देशाने बुद्धभूमी शिर्ला परिवाराच्या वतीने आयोजित नववधू-वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित या मेळाव्यात दोनशेहून अधिक वधू-वरांनी आपला परिचय देत नावनोंदणी केली. या उपक्रमामुळे परिसरातील विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध झाली.

दोनशेहून अधिक वधू-वरांचे एकाच व्यासपीठावर परिचय; बुद्धभूमी परिवाराचा सामूहिक विवाहाचा संकल्प
शिर्ला : विवाह जुळविताना होणारा अनावश्यक खर्च, आर्थिक ओढाताण आणि पालकांवरील वाढता आर्थिक भार कमी करण्याच्या सामाजिक उद्देशाने बुद्धभूमी शिर्ला परिवाराच्या वतीने आयोजित नववधू-वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित या मेळाव्यात दोनशेहून अधिक वधू-वरांनी आपला परिचय देत नावनोंदणी केली. या उपक्रमामुळे परिसरातील विवाहेच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध झाली.
यंदा पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुला-मुलींचे विवाह जुळविताना पालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च आणि इतर आर्थिक बाबींमुळे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन श्रमण चॅरिटेबल ट्रस्ट व बुद्धभूमी परिवार, शिर्ला यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र दारोकार गुरुजी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून भंते श्रद्धापाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भंते श्रद्धापाल यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले.
यावेळी अकोला तालुका पश्चिमचे भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बोधाचार्य शेषराव शिरसाट यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. मुला-मुलींचे विवाह जुळविताना होणारा अनावश्यक खर्च कमी व्हावा, पालकांना आर्थिक दिलासा मिळावा आणि विवाह प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच सामाजिक उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून बुद्धभूमी परिवाराच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भीमराव खंडारे, माणिकराव इंगळे आणि के. जी. वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात दोनशेहून अधिक विवाहेच्छुक वधू-वरांच्या पालकांनी आपल्या मुला-मुलींचा परिचय देत नावनोंदणी केली. त्यामुळे या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोज डोंगरे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी बुद्धभूमी परिवार तसेच पातूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर सरणत्तय घेऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली.

