Mahabreaking

[breaking_news]

Crackdown on child labor : शेगावात बालकामगारांविरोधात धडक कारवाई; तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता

Crackdown on child labor : शेगावात बालकामगारांविरोधात धडक कारवाई; तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता  बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 (सुधारणा 2016) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने शेगाव येथे विशेष धाडसत्र राबवून दोन आस्थापनांमधून तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Crackdown on child labor

 दोन आस्थापनांवर छापा; बालकामगार प्रकरणी गुन्हे दाखल, विशेष धाडसत्र यशस्वी

बुलढाणा  : बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 (सुधारणा 2016) अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने शेगाव येथे विशेष धाडसत्र राबवून दोन आस्थापनांमधून तीन बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी संबंधित आस्थापनाधारकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बालकामगार ही सामाजिकदृष्ट्या घातक व कायद्याने दंडनीय प्रथा रोखण्यासाठी 28 जुलै रोजी शेगाव शहरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान खामगाव रोडवरील इंडियन मोटर गॅरेज येथे एक बालकामगार काम करताना आढळून आला. तसेच महाराष्ट्र स्प्रिंग पार्ट अँड वेल्डिंग वर्क्स या आस्थापनात दोन किशोरवयीन कामगार कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

कृतीदलाने तात्काळ कारवाई करत तिन्ही बाल व किशोरवयीन कामगारांची मुक्तता केली. त्यानंतर संबंधित आस्थापनांच्या मालकांविरुद्ध बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

कामगार विभागाने स्पष्ट केले की, बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांना बेकायदेशीररीत्या रोजगार देणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. अधिनियमाच्या कलम 14 नुसार दोषी आस्थापनाधारकांवर दंड व कारावासाची तरतूद आहे. अशा प्रकारची माहिती कोणताही नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी संबंधित यंत्रणेला देऊ शकतो.

बालकामगारमुक्त समाजाची निर्मिती ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, बालकामगार आढळल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी तसेच कोणत्याही परिस्थितीत बालकामगारांना रोजगार देऊ नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.

ही संयुक्त कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत (अमरावती) व सहाय्यक कामगार आयुक्त राहुल काळे (अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत दुकाने निरीक्षक, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कामगार विभागाचे कर्मचारी तसेच शेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदविला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top