Mahabreaking

[breaking_news]

Cotton crop : कापूस येण्याआधीच कपाशी वाळली; सिंदखेडराजात २० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

Cotton crop : केवळ महिनाभर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर कपाशीची उगवण झाली. आता फुलपाखळ येऊन कापसाच्या बोंडांची निर्मिती होईल, या आशेने शेतकरी प्रतीक्षा करीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यातच तळपत्या उन्हाचा तडाखा वाढल्याने फुले उमलण्यापूर्वीच कळ्या आणि पात्या गळून पडल्या. परिणामी, सिंदखेडराजा तालुक्यातील तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक वाळून चालले असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

Cotton

 फुलं-कळ्यांवर उन्हाचा घाला; कपाशीचे पीक वाळले, शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

साखरखेर्डा  : केवळ महिनाभर समाधानकारक पाऊस झाल्यानंतर कपाशीची उगवण झाली. आता फुलपाखळ येऊन कापसाच्या बोंडांची निर्मिती होईल, या आशेने शेतकरी प्रतीक्षा करीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यातच तळपत्या उन्हाचा तडाखा वाढल्याने फुले उमलण्यापूर्वीच कळ्या आणि पात्या गळून पडल्या. परिणामी, सिंदखेडराजा तालुक्यातील तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक वाळून चालले असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे.

तालुक्यातील दुसरबीड, राहेरी बु., किनगाव राजा, जांभोरा, रुम्हणा, सोयंदेव, चांगेफळ, बोराखेडी गड्डे, सोनुशी, वर्दडी, भोसा, अडगाव राजा, सिंदखेडराजा, पिंपळगाव लेंडी, हनवतखेड, पळसखेड चक्का आणि माळसावरगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते.

या भागातील शेतकरी दरवर्षी मे महिन्यात कपाशीची लागवड करतात. ठिबक सिंचनाचा वापर करून कपाशीची उगवण चांगली व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. मे महिन्यात लागवड केल्यानंतर जूनमध्ये समाधानकारक पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, यंदा जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. विहिरींच्या पाण्याची पातळीही खालावली.

त्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशीची लागवड यशस्वी झाली आणि पीक जोमात येऊ लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा पाठ फिरवली. तग धरून उभ्या असलेल्या कपाशीला पुरेसा पाऊस न मिळाल्याने तिची वाढ खुंटली. सप्टेंबरमध्ये फुलकळी लागण्याची वेळ आली असतानाच उन्हाचा पारा चढला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये हिवाळ्याऐवजी उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने कपाशीची पाने, फुले आणि कळ्या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या.

आता अनेक शेतांमध्ये कपाशीची झाडे वाळू लागली असून, शेतशिवाराची अवस्था वाळवंटासारखी झाली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे पीक बाधित झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन आणि साखरखेर्डा महसूल मंडळातही कपाशीची अशीच परिस्थिती असल्याचे चित्र आहे.

बांधावर पाहणी; ऑनलाइन पंचनाम्याची किचकट प्रक्रिया

दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पाहणी करीत आहेत. मात्र, प्रत्येक शेतात जाऊन ऑनलाइन पाहणी करून अहवाल सादर करण्याची प्रक्रिया किचकट ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असून, काही ठिकाणी ऑनलाइन प्रणाली व्यवस्थित काम करीत नसल्याने पंचनाम्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे.

महसूल विभागाने प्रत्यक्ष पिकपेरा ग्राह्य धरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी प्रल्हाद खरात (जांभोरा) यांनी केली.

“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ग्राम महसूल अधिकारी पाहणी करीत आहेत. मात्र, ही पाहणी आणखी किती दिवस चालणार? मागील अहवाल आणि उपलब्ध पिकपेरा ग्राह्य धरून याद्या तयार करून तातडीने अहवाल सादर करावा. पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेतकरी अडकून राहू नये,” अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे नेते वामनराव जाधव (सिंदखेडराजा) यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top