Mahabreaking

[breaking_news]

Corporators-group leaders :देऊळगाव राजात नागरी समस्यांवरून नगरसेवक-गटनेते आक्रमक

Corporators-group leaders : शहरातील विविध नागरी समस्यांबाबत नगरपालिकेच्या गटनेत्या व नगरसेवकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. प्रशासक राज संपुष्टात येऊन नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाल्यानंतर शहरवासीयांना लोकशाही परतल्याचा अनुभव आला असला, तरी मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांनाच निवेदन द्यावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Deulgaon Raja

विविध समस्या सोडवण्याची मागणी; नगराध्यक्षांचे समस्या सोडवण्याचे आश्वासन

गजानन तिडके

देऊळगाव राजा :शहरातील विविध नागरी समस्यांबाबत नगरपालिकेच्या गटनेत्या व नगरसेवकांनी प्रशासनाला निवेदन सादर करत प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. प्रशासक राज संपुष्टात येऊन नव्या लोकप्रतिनिधींची निवड झाल्यानंतर शहरवासीयांना लोकशाही परतल्याचा अनुभव आला असला, तरी मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांनाच निवेदन द्यावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रभाग क्रमांक १० मधील समस्या मांडताना नगरसेविका दिशा किशोर खांडेभराड यांनी आमना नदी ते पिंपळनेर मार्गावरील काळुकादेवी मंदिरासमोरील बंद अवस्थेतील हायमास्ट दिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. या मार्गावर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून चोरी-अपघाताची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्या रंजना अनिल रामाने व इतर नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर, कचऱ्याचे साचलेले ढीग आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ पालिकेने उभारलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला त्यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना नगराध्यक्षा माधुरी शिपने, उपनगराध्यक्षा वनिता भुतडा व मुख्याधिकारी अरुण मोकळ उपस्थित होते. निवेदनावर दिशा खांडेभराड, रंजना रामाने, कासिफ कोटकर, शिवाजी मेहत्रे, अन्वर शेख, विद्या कासारे, शितल खराट आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता व सुरक्षिततेचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातात का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पालिका प्रशासनाला विद्यमान नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध समस्यांसंदर्भात निवेदन दिले आहे. त्यानुसार हायमास्ट दिवे सुरू करणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणणे, शहर स्वच्छता मोहीम राबविणे तसेच इतर प्रलंबित कामांना पालिकेने सुरुवात केली आहे. नगरपालिका शॉपिंग सेंटरला स्वर्गीय अजित दादा पवार यांचे नाव देण्याबाबत पालिका प्रशासन पूर्णतः सकारात्मक असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येणार आहे.

— माधुरीताई शिपने,नगराध्यक्षा, नगर परिषद देऊळगाव राजा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top