Shivlila Amrit Parayan : मांडवा येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाची सांगता सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने मोठ्या उत्साहात करण्यात आली.

रमेश खंडागळे
बीबी : मांडवा येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहाची सांगता सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने मोठ्या उत्साहात करण्यात आली.
मांडवा येथे सुरू असलेला हा सप्ताह यंदा पंधराव्या वर्षात प्रवेशला असून ९ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या सप्ताहानिमित्त दररोज भोलेनाथाच्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, सकाळी १० ते १२ श्री शिवलीला पारायण, दुपारी १ ते ४ संगीत रामकथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत होते. दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी परमपूज्य गुरुवर्य श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांचे प्रवचन झाले. तसेच दररोज रामकथेची सेवा रामायणाचार्य हभप श्री अनिल महाराज चेके यांनी दिली. शिवलीला अमृत पारायणाचे नेतृत्व हभप श्रीराम महाराज कुहिटे व हभप ज्ञानेश्वर महाराज कुहिटे यांनी केले.
दररोज रात्रीच्या हरिकीर्तनाची सेवा हभप तुकाराम महाराज मुंडे (बीड), हभप संतोष महाराज वनवे (अहिल्यानगर), हभप गणेश महाराज वारंगे (परतूर), हभप अशोक महाराज इलग (अहिल्यानगर), हभप सुधाकर महाराज वाघ (संभाजीनगर), हभप चैताली ताई महाराज जाधव (घारगाव) आणि हभप सोमनाथ महाराज कराळे (पैठण) यांनी दिली. १६ फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन हभप अनिल महाराज चेके यांच्या कीर्तन सेवेने पार पडले. यानंतर पंचक्रोशीतील भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘बम बम भोले’च्या गजरात मांडवा नगरी दुमदुमून गेली होती. गावातील सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने राहून महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

