Clash : साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेसमोर पुन्हा मटण दुकाने थाटल्याने दोन गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, शाळेपासून ५० मीटरच्या परिसरात मटण किंवा चिकनची दुकाने लावू नयेत, अशी सक्त ताकीद पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.

शाळेसमोर मटण दुकाने थाटण्यावरून दोन गट आमनेसामने; पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाद शांत
साखरखेर्डा : साखरखेर्डा बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेसमोर पुन्हा मटण दुकाने थाटल्याने दोन गट आमनेसामने आले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, शाळेपासून ५० मीटरच्या परिसरात मटण किंवा चिकनची दुकाने लावू नयेत, अशी सक्त ताकीद पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेसमोर मोठ्या संख्येने मटण विक्रीची दुकाने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. ही दुकाने हटविण्यात यावीत, अशी मागणी शाळा समितीच्या सदस्यांनी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागासह संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार करून केली होती.
रस्त्याच्या मध्यभागी दुकान थाटल्याने खळबळ
दरम्यान, मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी काही मटण विक्रेत्यांनी रस्त्यावरील डिव्हायडरवरच दुकाने थाटून व्यवसाय सुरू केला. यामुळे गावात खळबळ उडाली. काही दुकाने हटविली जात असताना इतर काही दुकाने मात्र शाळेसमोर सुरू असल्याचा आरोप संबंधितांनी केला. ‘आमच्याच दुकानांवर कारवाई का?’ असा सवाल उपस्थित करीत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
याच मुद्द्यावरून काही मटण विक्रेत्यांनी साखरखेर्डा-लव्हाळा मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
शाळा समितीचा पोलिसांना फोन
या प्रकाराची माहिती गावात पसरल्यानंतर शाळा समितीचे सदस्य आणि काही नागरिकांनी ठाणेदार युवराज रबडे यांच्याशी संपर्क साधून वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगितले. संबंधित परिसर ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका त्यावेळी मांडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, दुपारी सुमारे एक वाजता ग्रामपंचायत अधिकारी मनोज मोरे आणि ठाणेदार युवराज रबडे हे पोलिस व कर्मचाऱ्यांसह वादग्रस्त ठिकाणी दाखल झाले.
५० मीटर परिसरात दुकाने न लावण्याची सक्त ताकीद
पोलिस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद उर्दू शाळेसमोरील ५० मीटर परिसरात कोणतेही मटण किंवा चिकनचे दुकान लावू नये, अशी सक्त ताकीद दिली. यापूर्वी सुरू असलेली दुकाने तत्काळ बंद करून पर्यायी व्यवस्था करावी, असेही संबंधितांना स्पष्ट करण्यात आले.
मात्र, या कारवाईदरम्यान दोन्ही गटांतील नागरिकांमध्ये पुन्हा वाद निर्माण झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शाळेसमोर आणि रस्त्यावर मटण मार्केट असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. या परिसरात मोठ्या संख्येने मोकाट कुत्री फिरत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. एखाद्या विद्यार्थ्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करण्याची शक्यता असल्याने संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, मंगळवारी झालेला वाद पोलिसांच्या हस्तक्षेपाने शांत झाला असला, तरी मटण दुकाने हटविण्याच्या प्रश्नावरून दोन गटांमध्ये पुन्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

